Child Development : मुलांच्या मानसिक, भावनिक विकासासाठी कला महत्त्वाची : ल. म. कडू
esakal April 17, 2025 05:45 AM

पुणे : ‘मुलांच्या विकासात कला ही सर्वात महत्त्वाची आहे. अभ्यासाच्या दडपणाने पालक मुले मोठी होत असताना, कलेला दुय्यम स्थान देतात. पण मुलांच्या जडणघडणीत चित्रकला ही असायलाच हवी. त्यातून मुलांचे भावविश्व खुलते आणि त्यांचा मानसिक विकास होतो,’’ असा सल्ला साहित्यिक ल. म. कडू यांनी दिला.

‘शब्दसारथी’च्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव पोतदार यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित कर्तृत्वरत्न पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक आणि योगगुरू संप्रसाद विनोद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कडू यांच्यासह श्यामची आई फाउंडेशनच्या संस्थापक शीतल बापट, पत्रकार अरुण मेहेत्रे, शाहीर हेमंतराजे मावळे, चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पोतदार यांच्या ‘अंतरीचा देव माणूस’ आणि स्वप्नगंधा पोतदार-वस्ते लिखित ‘माय पीस’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रत्येक धडपडणाऱ्या मुलांच्या मागे आपण समाज म्हणून उभे राहणे गरजेचे असल्याचे बापट यांनी अधोरेखित केले.

डॉ. टिळक म्हणाले,‘‘आचार्य या शब्दाला आपल्या परंपरेत वेगळा अर्थ आहे. ज्याचे जीवन, जीवनमूल्ये आचरणातून सतत समोर येत असतात, त्याला आचार्य म्हणतात. माधव पोतदार यांना ही पदवी शोभते. जीवनाची दिशा कळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जगण्याचे सूत्र गवसणे महत्त्वाचे आहे. जीवनसूत्रांचा संबंध व्यक्तीच्या जडणघडणीशी आहे. आजचा एकूणच समाज इतिहासात गुंतत चाललो आहोत. इतिहासातील वाद व्यवहारात आणून वर्तमान नसविण्याचे काम करत आहोत.

संप्रसाद विनोद म्हणाले,‘‘कोणतीही परंपरा टिकवायची असेल, तर आचरणातून परंपरेचे विचार रुजविणारे संस्कार होणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात आई-वडिलांना मुलांकडे पाहायला वेळ नसतो. त्यामुळे मुलांना अनुकरण करायला काहीच मिळत नाही. सर्व पालकांसमोर ‘पॅरेंटिंग’ हा विषय आहे. पुस्तकातून शिक्षण मिळते आणि समोरील व्यक्तीच्या आचरणातून, अनुभवातून ज्ञान मिळते.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा पोतदार यांनी, तर सूत्रसंचालन पराग पोतदार यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.