MI vs GT: मुंबईच्या पराभवानंतरही हार्दिक पांड्या आहे खूश, कारण सांगताना म्हणतो, 'संघातील खेळाडूंनी...'
esakal May 07, 2025 10:45 AM

मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत झालेला सामना शेवटच्या सामन्यापर्यंत अत्यंत रोमांचक झाला. पावसाच्या अडथळ्यामुळे सामना कधी गुजरातच्या, तर कधी मुंबईच्या बाजूने झुकताना दिसत होता.

पण अखेर शेवटच्या चेंडूवर गुजरातने डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेट्सने हा सामना जिंकला. पण या सामन्यानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाने दिलेल्या झुंजेबद्दल आनंद व्यक्त केला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली होती. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५५ धावा केल्या. मुंबईकडून विल जॅक्सने ३५ चेंडूत ५३ धावांची खेळी केली.

तसेच सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. कॉर्बिन बॉशने २७ धावा केल्या. बाकी सर्वजण १० धावांच्या आतच धावा करू शकले. गुजरातकडून ६ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.

त्यानंतर गुजरात १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले. पण १४ व्या आणि १८ व्या षटकानंतर पावसामुळे व्यत्यय आला. अखेर १८ व्या षटकानंतर खेळ पुन्हा सुरू झाला, तेव्हा एक षटक कमी करण्यात आले आणि डकवर्थ लुईस नियमानुसार गुजरातसमोर १९ षटकात १४७ धावा असे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.

म्हणजेच गुजरातने १८ षटकात ६ बाद १३२ धावा केलेल्या असल्याने त्यांना ६ चेंडूत विजयासाठी १५ धावांची गरज होती. गुजरातने हे लक्ष्य १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले आणि हा सामना जिंकला.

गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ४६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली, तसेच जॉस बटलरने ३० धावांची खेळी केली. शेरफेन रुदरफोर्डने २८ धावा केल्या. शेवटी राहुल तेवातिया ११ धावांवर नाबाद राहिला आणि गेराल्ड कोएत्झीने १२ धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली.

मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी धावा कमी असतानाही गुजरातला रोखण्याचा चांगला प्रयत्न केला होता.

या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, 'मला वाटतं आम्ही चांगले लढलो. आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करत होतो. मला वाटत नाही की ही १५० धावांची खेळपट्टी होती, आम्ही २५ धावा कमी पडलो. पण संपूर्ण डावात गोलंदाजांनी जी झुंज दिली, त्यांना श्रेय द्यावे लागेल.'

'झेल सुटणं महागात पडतं, पण आम्हाला सुदैवानं ते महागात पडलं नाही. खेळाडूंनी हार न मानता त्यांचे १२० टक्के दिल्याने मी खरंच आनंदी आहे. पहिल्या डावात मैदान ओले नव्हते. पण दुसऱ्या डावात सातत्याने पाऊस येत होता, त्यामुळे थोडं कठीण झालं होतं. याची आम्हाला मदत झाली की नाही माहित नाही. पण आम्हाला सामना खेळायचा होता आणि आम्ही तो खेळला.'

दरम्यान, मुंबईचा हा १२ वा सामना होता. मुंबईला सलग ६ विजयानंतर पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे आता ७ विजयांसह १४ गुण आहेत. आता त्यांचे साखळी फेरीतील दोनच सामने बाकी आहेत. त्यांना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांविरुद्ध सामना खेळायचा आहे. मुंबईसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हे दोन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.