Mohol : सोशल मीडियावर मेसेज टाकून तरुणाने संपवले जीवन; १३ जणांवर गुन्हा दाखल, वेगळचं कारण आलं समाेर..
esakal April 18, 2025 04:45 PM

मोहोळ: शेतीच्या वाटणीवरून सातत्याने आई, वडील, भाऊ, बहिणींसह अन्य नातेवाइकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर टाकून स्वत:च्या शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.

याप्रकरणी आई, वडील, भाऊ, बहिणींसह १३ नातेवाइकांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी ८.५० च्या दरम्यान अनगर येथे घडली. सिद्धेश्वर सत्यवान गुंड असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. अनगर येथील सिद्धेश्वर सत्यवान गुंड याचे सासरे शिवाजी सूर्यभान सालगुडे (रा. कुरणवाडी, अनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नुसार, त्यांच्या मुलीचा विवाह सिद्धेश्वर गुंड याच्याशी २०१६ मध्ये झाला होता.

विवाहाच्या दोन वर्षांनंतर जावई सिद्धेश्वर गुंड यांच्या घरात शेतीच्या वाटणीवरून वारंवार तक्रारी होत होत्या. त्याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात जावयाच्या विरोधात त्याचे वडील व भाऊंनी तक्रारी दाखल केल्या होत्या. सासरी शेताच्या कारणावरून घरात वाद-विवाद होत असल्याने मुलगी माहेरी निघून आली होती. दरम्यान, १६ एप्रिल रोजी जावई सिद्धेश्वरच्या मोबाईलवरून मेसेज आला.

त्यात जावई सिद्धेश्वरने वडील सत्यवान गुंड, आई इंदू गुंड, भाऊ बळिराम ऊर्फ दादा गुंड, वहिनी वनिता (चौघे रा. अनगर), बहीण सुरेखा लटके, नंदवा अंकुश लटके (रा. अंजनगाव), संतोष शेंबडे (रा. कोन्हेरी), प्रमिला सगरे (रा. अनगर), मामा हनुमंत गायकवाड (रा. बिटले), शेजारी ज्ञानदेव सरक (रा. अनगर), चुलत भाऊ गजानन गुंड व दत्तात्रय गुंड (रा. भोसे), चुलत बहीण रेणुका डोके (रा. सोलापूर) यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल टाकत आहे, असा उल्लेख केला होता. यावरून १३ जणांवर गुन्हा दाखल झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.