इंडियन प्रीमिअर लीग २०२५ सोबत स्पर्धा करायला निघालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) दिवसेंदिवस नाचक्की होतेय. पाकिस्तान सुपर लीग ( PSL) सुरू आहे आणि इथे कराची किंग्स हा संघ सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कधी हेअर ड्रायर तर कधी ट्रिमर बक्षीस म्हणून देताना दिसत आहेत. काल कराची किंग्स विरुद्ध लाहोर कलंदर यांच्यात सामना झाला आणि त्यात हसन अलनीने सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्याला बक्षीस म्हणून ट्रिमर देण्यात आला.
कराची किंग्सला या सामन्यात ६५ धावांनी पराभव पत्करावा लागला, परंतु हसन अलीने ४ षटकांत २८ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला ट्रिमर देण्यात आला, यापूर्वी कराची किंग्सच्याच जेम्स व्हिन्सीला पेशावर झाल्मीविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले म्हणून हेअर ड्रायर दिला गेला होता.
"आम्ही सुरुवातीच्या विकेट्स गमावल्या, भागीदारी करू शकलो नाही आणि दबाव वाढत गेला. सुधारणेसाठी टीका ठीक आहे, पण जेव्हा कुटुंबांना लक्ष्य केले जाते, तेव्हा त्याचा सर्वांवर परिणाम होतो. आमचे काम कामगिरीने उत्तर देणे आहे," असे हसन अलीने सामन्यानंतर सांगितले.
PSL 2025 मध्ये पेशावर झाल्मीचा कर्णधार बाबर आजम याच्या खराब फॉर्मची मालिका सुरूच आहे. पीएसएल २०२५ मध्ये त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे ० (२) आणि १ (२) धावा केल्या. बाबरच्या नेतृत्वाखाली पेशावर झाल्मीने सलग दोन मोठे पराभव पत्करले. क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध ८० धावांनी आणि इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध १०२ धावांनी झाल्मी पराभूत झाली.
५४ वर्षीय बासित अली यांनी बाबरच्या नेतृत्वावर आणि कामगिरीवर तीव्र टीका केली. त्यांनी बाबरला कर्णधारपद सोडून आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. बासित यांनी विराट कोहलीचे उदाहरण देत आपले मत मांडले, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) चे कर्णधारपद सोडून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले.
बासित यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, "बाबरने कर्णधारपद सोडून आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे. २४० पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तो स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. तो लक्ष केंद्रित करत नाही. झाल्मी व्यवस्थापनाने त्याला कर्णधारपदावरून हटवून फलंदाज म्हणून खेळवावे. तो स्वतःचे नुकसान करत आहे. बाबर काहीही करत नाही; तो फक्त खेळत राहतो."