माझ्या आयुष्याचा आत्मा
esakal April 19, 2025 11:45 AM

सोनल पवार - अभिनेत्री

माझ्यासाठी आई म्हणजे बिनशर्त प्रेम, आधाराची भक्कम भिंत, आणि न थकणारा, न संपणारा प्रेरणेचा स्रोत. माझी आई सविता ही केवळ माझी जन्मदात्री नाही, तर ती माझ्या आयुष्याचा आत्मा आहे. ती माझ्या प्रत्येक आनंदात, दुःखात, यशात, अपयशात अगदी पावलोपावली सोबत उभी राहणारी माझी सखी आहे. आईचं प्रेम हे असंच असतं. कुठल्याही अटीशिवाय, शुद्ध आणि नितळ. तिच्या कुशीत मिळणारी ऊब, तिच्या हातानं दिलेला गरम दुधाचा कप आणि तिच्या हातावरची मायेची थाप हे सारे अनुभव आजही मला सावरण्याचं बळ देतात. माझ्या बालपणात ती फक्त आई नव्हती, तर माझ्यासाठी ती खेळणारी सखी, अभ्यास घेणारी शिक्षिका आणि चुकल्यावर समजावणारी गुरू होती. ती नेहमी म्हणायची, ‘‘तू जे काही ठरवशील, ते तू करू शकतेस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव.’’ तिचं हे वाक्य मी मनात कोरून ठेवलं आहे. अनेकदा मी आयुष्यात गोंधळले, भीतीने गाठले; पण तिचे शब्द आणि तिचा हात माझ्या पाठीवर होता. तिच्या त्या प्रेमळ स्पर्शानं आणि बोलण्यानं मला पुन्हा उभं राहायला मदत झाली.

आईने मला शिकवलं, की अपयश हा यशापर्यंतचा एक भाग आहे आणि खऱ्या यशासाठी मेहनत, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन लागतो. तिच्या शिकवणुकीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. ती नेहमी माझ्या पाठीशी ठाम उभी राहिली. कधी प्रार्थनांनी, तर कधी तिच्या उपस्थितीनं. आईसारखं कोणीही नाही. ती घराच्या चौकटीतील शांत शक्ती आहे, जी घरातले प्रत्येक संकट सामावून घेते आणि त्यावर हसत मार्ग काढते. तिच्या प्रेमामुळेच मला जग जिंकण्याचा आत्मविश्वास मिळतो. तिच्या असण्यानंच माझं जग सुंदर आणि पूर्ण आहे. आई म्हणजे फक्त एक नातं नाही, ती एक भावना आहे, जी माझ्या हृदयात कायम घर करून आहे. तिच्या मायेच्या सावलीत वाढल्यामुळेच मी आज इतकी ठाम, आत्मविश्वासी आणि प्रेमळ स्त्री होऊ शकले.

आईमुळे आमच्या कुटुंबात खूप सकारात्मकतेचा, प्रेमाचा आणि आनंदाचा शिरकाव झाला. तिचं हसतमुख, सुसंवादी आणि समजूतदार वागणं हे आमच्या घराचं खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू आहे. ती केवळ घर चालवणारी स्त्री नाही, तर आमच्या कुटुंबाच्या प्रत्येक नात्यातले धागे घट्ट विणणारी आधारस्तंभ आहे. तिनं आम्हाला नेहमी एकत्र जेवायला बसण्याची, एकमेकांचं ऐकण्याची आणि मन मोकळं करून बोलण्याची सवय लावली. याच सवयी आमच्यात एकमेकांप्रती विश्वास आणि आपुलकी वाढवतात. तिनं आम्हाला शिकवलं, की जेवण फक्त पोटाची भूक भागवणं नसून, ते एकत्र येण्याचा, प्रेम वाटून घेण्याचा आणि दिवसाची थोडी विश्रांती घेण्याचा सुंदर क्षण असतो.

आमच्या कुटुंबात काहीही अडचण आली, की आईचं पहिलं वाक्य असतं, ‘‘चल, चहा घेऊया.’’ त्या एका गरम चहाच्या कपात तिचं प्रेम, समजूत आणि अनुभव यांचं सुंदर मिश्रण असतं. त्या छोट्या ब्रेकमध्ये ती आमची काळजी ऐकते, समजते आणि अगदी सहजपणे मार्ग सुचवते. ती अशीच आहे - मोठमोठ्या समस्यांनाही छोट्या गप्पांमधून हलकं करून टाकणारी. तिच्यामुळे आमचं घर म्हणजे फक्त चार भिंतींची वास्तू न राहता, प्रेमानं आणि आपुलकीनं भरलेलं एक सुखद गोकुळ बनलं आहे. तिचं हास्य, तिचं धैर्य आणि तिचं घराला एकत्र ठेवण्याचं कौशल्य यामुळेच आमचं कुटुंब एकमेकांच्या प्रेमात गुंफलेलं आहे.

आईमुळे मला वाचनाची आवड लागली. ती लहानपणी मला झोपताना गोष्टी सांगायची आणि मग एक दिवस म्हणाली, ‘‘तूच आता मला गोष्ट वाचून दाखव.’’ तिथून माझ्या वाचनप्रेमाची सुरुवात झाली. अभिनयात रस असण्यामागेही तीच आहे.

मी सध्या ‘अँड टीव्ही’वर ‘हप्पू की उलटन पलटन’ या मालिकेत मलायकाची भूमिका साकारत आहे. त्याचं श्रेयही आईच आहे.ती नेहमी सांगायची, ‘‘लोकांना हसवणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे.’’ कदाचित त्याच विचारानं मी अभिनयाची वाट धरली. शिवाय, आईमुळे मला घरात स्वयंपाक, सजावट आणि गोड बोलण्याची सवयही लागली, जी आज माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली आहे.

आईचा धीर, परिस्थिती कितीही अवघड असली, तरीही शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता हे गुण मी शिकायचा प्रयत्न करते. तिची माणसांशी जोडून घेण्याची कला आणि कोणत्याही व्यक्तीतलं चांगलं बघण्याची वृत्ती मला फार आवडते. ती नेहमी म्हणते, ‘संकटातही तू हास्य टिकवू शकलीस, तर तू खूप मोठी झालीस.’ हा तिचा दृष्टिकोन मला आजही प्रेरणा देतो.

आईविषयी एक हृदयस्पर्शी आठवण आहे. मी एकदा चित्रीकरणावरून परत आले होते. खूप दमलेली, शरीर थकलेलं आणि मनात एक विचित्र अशांतपणा होता. दिवसभर धावपळीमुळे डोकंही भरलेलं आणि कुणाशी बोलायचीही इच्छाच नव्हती. मी फक्त शांतपणे येऊन खुर्चीत बसले. काही न बोलता, काही न विचारता, आई शांतपणे स्वयंपाकघरात गेली. काही मिनिटांनी ती माझ्या हातात गरमागरम गूळपोळीचा घास घेऊन आली आणि अगदी हळूच म्हणाली, ‘तुझ्या चेहऱ्यावरचा थकवा गेला, की मला समाधान मिळतं.’ त्या एका वाक्यानं आणि त्या एका घासानं माझ्या मनावरचं सगळं ओझं हलकं झालं. तो घास केवळ गोड नव्हता, तर त्यात तिचं प्रेम, काळजी आणि समजूत मिसळलेली होती. त्या क्षणात वाटलं, की हा पुरस्कार आहे जो कोणत्याही ट्रॉफीपेक्षा, कोणत्याही टाळ्यांपेक्षा मोठा आहे.

आईचं हे न बोलता सर्वकाही समजून घेणं, हीच ती जादू आहे जी कुणालाही मिळाली, तर ते खूप नशीबवान ठरतील. आजही जेव्हा थकल्यासारखं वाटतं, मन गोंधळलेलं असतं, तेव्हा त्या गूळपोळीच्या घासाची आठवण मला आतून उभं करते. आई म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, जी प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत असते, अगदी दिसली नाही तरीही. तिच्यासारखी बनणं म्हणजे आयुष्यातला सर्वोच्च सन्मानच आहे आणि मी मनापासून प्रयत्न करते की तिच्या गुणांचं प्रतिबिंब माझ्यात दिसावं.

आईनं एकदा मला सांगितलेलं वाक्य मी कधीच विसरणार नाही, ‘स्वप्नं मोठी बघ; पण पाय कायम जमिनीवर ठेव; कारण तिथंच आईसारखी माणसं उभी असतात.’

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.