देगलूर : तालुक्यातील सांगवी उमर लेंडी नदीपात्रातून रेती तस्करांनी रात्रंदिवस रेतीचे उत्खनन व तस्करी सुरूच ठेवल्याने नदी पात्र वाळवंट होण्याच्या मार्गावर गेली आहे. शासकीय रेती घाटाच्या लिलावाची प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नसताना तत्पूर्वीच तष्करानी नदीत
बेसुमार उत्खनन सुरूच ठेवल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप यायला लागले आहे. जास्तीच्या उत्खननामुळे पाण्याच्या पातळीचा ही धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. याकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने तष्करांचे फावत आहे.
तलाठी, मंडळअधिकारी बीट जमादारांचे याकडे दुर्लक्ष....
या भागातील शासकीय कर्मचारी असलेले तलाठी, मंडळ अधिकारी बीट जमादार यांना या प्रकरणाची कल्पना नाही असे म्हणता येणार नाही. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यामागे अर्थपूर्ण कारण असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील शासकीय रेती केंद्राची लिलाव प्रक्रिया अद्यापही झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील काही खाजगी रेती केंद्रातून रेती उत्खनणास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र याचाही गैरफायदा तस्कर घेत आहेत. एका जागे ऐवजी इतरत्र रेती उत्खनन करून रॉयल्टीच्या एकाच पावत्यावर अनेक वाहनातून तस्करीचा गोरखधंदा बिनभोबाटपणे सुरू आहे.
याकडे ना महसूल प्रशासनाचे लक्ष आहे, ना... पोलिसांचे आहे, ना परिवहन खात्याचे... आहे. लिलावापूर्वीच नदीतील रेती उचलली गेली तर ते केंद्र कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम प्रशासनातील यंत्रणांने करण्याची गरज निर्माण झाली आहे.