गावाच्या मुख्य रस्त्यावर रामदास मोरेंचं किराणा मालाचं दुकान होतं. चिकाटीने धंदा करून रामदास मोरेने आपलं दुकान वाढवत नेलं होतं. नरेश आणि मंगेश ही दोन पोरंही त्याच्या मदतीला होती. कामावर एक नोकरही होता. चांगले कमाई करून होते. एक दिवस त्यांच्या दुकानावर गेलो, म्हणजे तसा नेहमीच जायचो. कारण रामदास जिवाभावाचा मित्र होता.
किराणा वाणं घ्यायलाही दुकानवर नेहमीच जावं लागायचं. त्या दिवशी रामदास दुकानवर नव्हता. दोन्ही पोरच होते. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर मोठा नरेश अगदी कळवळून, व्याकूळ होऊन म्हणाला, ‘काका, तुम्हाले एक गोष्ट बोलायची होती. तुमच्याशिवाय आमाले कोण जवळंच हाये? तुम्हाले नाही त कोणाले सांगावं?’
‘आरे सांग नं मग? त्यात काय एवढं विचारायचं!’
‘आहो काका, सांगा नं आमच्या बापाले, आमचं लगन करायचं. आता माहं वय बेच्याळीस झालं. हा मंगेश अडोतीस वर्षांचा झाला... तरी आमचे दोनाचे चार हात करून देत नाही काय. लोक लय नावं ठेवतात आम्हाले. कधी तुमचं बाशिंगबळ जुळून येते असं म्हणतात.’
मी नरेशकडे पाहिलं. खरोखर खूप व्याकूळ दिसत होता तो! हक्काच्या माणसाजवळ सांगावं, तसं मला हक्काने सांगत होता. खरंच नरेशच्या डोक्याचे अर्धे केस गेले होते. टक्कल पडलं होतं. तो दाढी-मिशी ठेवत नव्हता, पण मंगेश ठेवत होता. त्याच्या मिशीतले अर्धे केस पांढरे झाले होते. तरीही अद्याप या पोरांचे लग्न झाले नव्हते.
खरं म्हणजे ते पोरं नव्हतेच. ते मोठी माणसे झाले होते. त्यांची कमाई चांगली होती. दोन मजली घर होतं. थोडी फार शेतीही घेतली होती, तरी त्यांची लग्न जुळत नव्हती. खरं म्हणजे, या पोरांची आई आणि बापही माझ्याकडे हाच तगादा लावत होते. माझ्याजवळच नाही तर भेटणाऱ्या प्रत्येकाला ते सांगत होते. आता पोरंही सांगायला लागले होते.
‘मी पाह्यली होती गड्या तुमच्यासाठी सोयरिक.... पण त्या पोरीचं वय लहान पडते....’
‘लहान पडते त मंग या लाह्यन्याचं करून टाकू... माहं राह्यलं तर राहू देऊ... निदान दोघातल्या एकाचे तरी हात पिवळे होतील.’
‘नाही नाही काका... आधी मोठ्याचंच होऊ देऊ...’ - मंगेश.
दोघं असे बोलत होते की, जसं काही पोरीवाला आताच त्यांची सोयरिक जुळवायला बैठकीत बसला होता. खरोखरच ते जरा वेगळंच वागत होते.
‘आमचा बाप कधी कधी म्हणते, तुमच्या सोयरिकी तुम्हीच जुळवा... कोणत्याबी जातीची पोरगी करून आणा, पण या नाकपुडी एवढ्या गावात कुठी प्रेमप्रकरणं अन् प्रेमविवाह होतात का काका? जव्हा आम्ही कॉलेजले होतो, तव्हा जुळवलं होतं म्या एका पोरीशी सुत... त बापम्हणे गरीबच हाये, हलक्या जातीची हाये. तव्हा नाकानं कांदे सोलले अन् आता कोरड्या खडकावर आदळले... तुम्हीच सांगा, लग्न नसलं त काय चाटायची काय कमाई...’
बाप दुकानात नव्हताच तर बापावर सूड उगवल्यासारखे दोघंही बापाच्या नावानं माझ्याजवळ कण्या कांडाय लागले. कसमसून आले. रडकुंडी आले... जुनं- पुराणं काढून पश्चातापात होरपळू लागले. ‘‘सांगतो तुमच्या बापाले... अन् मीही लक्ष ठेवतो.’ असे खोटंच आश्वासन देऊन मी तिथून सटकलो. तसाच येताना त्यांच्या घरून आलो, तर त्यांचे माय-बापही पार वैतागलेले. रामदास मोरेच्या बायकोने तर पोरांच्या लग्नापायी हायच खाल्लेली दिसत होती.
‘आरे बाबा जिथं नाही तिथं जातो आम्ही ठेपा लागला की! पण पोरीवाल्यायचे आता लय भाव वाढले... सरकारी नोकरी पाह्यजे म्हणतात. घरची शेती पाह्यजे म्हणतात... पोरगं एकुलतं एक पाह्यजे म्हणतात. सासू- सासरे नाही पाह्यजे म्हणतात... याच्यापेक्षा आमचा एक सोयरा हाये पारधचा. त्यानं त डायरेक परक्या समाजाच्या सुना आणल्या डोंगरवाडीहून.
बिचाऱ्या मस्त संसार करून राह्यल्या. आम्हीबी आता त्योच इच्यार करून राह्यलो. इच्यार करून नाही राह्यलो. तसंच करणार हाये... चुलीत गेल्या त्या जाती-पाती, अन् उडत गेली ती श्रीमंती... गरिबी! आता फक्त दोनाचे चार हात होणं हेच म्हत्वाचं हाये आजच्या काळात.’
रामदास मोरे, तर खरोखर त्याच्या पोरापेक्षाही पार वैतागून गेला होता. त्याची बायको वैतागलेली होती. सगळं घरच वसाणवाडा झाल्यासारखं वाटत होतं. मला आठवलं, पूर्वी ह्याच देशमुख, पाटील समाजात पोरीच्या लग्नापायी शेतं विकावे लागायचे. हुंडा एवढा द्यावा लागायचा की, पोरीच्या लग्नापायी माय-बापांच्या नाकीनऊ यायचे.
पोरीच्या लग्नाच्या चिंतेपायी मायबाप व्याकुळ व्हायचे. पोरीचं बाशिंगबळ कधी जुळून येते, म्हणताना हैराण व्हायचे. पोरीचं लग्न करताना शेतीवाडीची विक्री करून कंगाल दरिद्री व्हायचे. मात्र, प्रत्येकाचा काळ येतो म्हणतात, ते काही खोटं नाही. ‘परिवर्तनही संसार का नियम है।’ असं गीता सांगते, ते उगीच नाही. काय पोरावाल्यांची चढती कमान होती. आज पोरीवाल्यांची झाली!
हे रामदास मोरे नावाच्या कुटुंबाचं जे वर सांगितलं ते एका समाजाचं प्रातिनिधिक चित्र आहे. जो संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. ज्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे अशा उपवर मुलांचे लग्न जुळण्यात तर प्रचंड अडचणी आहेत. कारण ‘शेतकरी नवरा नको गं बाई!’ अशी तरुण मुलींची बहुतांशी मानसिकता झालेली आहे.
कारण बहुतांशी गावखेड्यातील मुली आता विविध शाखेतून पदवी घेऊन पदवीधर झालेल्या आहेत. काही विविध क्षेत्रांत कमी-अधिक प्रकारच्या नोकऱ्याही करत आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. दुसरीकडे शेती ओलिती असो की, कोरडवाहू आजच्या युगात ती परवडेनाशी झाली आहे. शेतीच्या क्षेत्रात विविध कारणांनी आर्थिक कुचंबणा आहे.
त्यामुळे उपवर मुलांची संख्या वाढली आहे. कोणत्याही गावात गेलो, तर तिशी उलटून गेली तरी लग्न न झालेली नरेश आणि मंगेशसारखी खूप मुले आहेत. मात्र याचाच एक परिणाम असा झाला आहे की जात-पात, गण-गोत्र न पाहता सर्रास आंतरजातीय विवाह होत आहेत. अनंत काळापासून जी जातिभेदाची उतरंड होती, ती विवाहसंस्थेच्या या सामाजिक गरजेतून ढासळू लागली आहे. असेही एक परिवर्तनशील आणि सकारात्मक चित्र निर्माण झालेले दिसून येते.
शहर असो किंवा खेडे, विवाह जुळण्यातील अडचणी सारख्याच आहेत. फरक एवढाच की, शहरी भागात, महानगरात सर्वच बाबतीत संधी अधिक आहेत, हे नाकारता येत नाही. त्यामुळे तरुण- तरुणीमध्ये शहरी जीवनमानाचे आकर्षण अधिक वाढीला लागणे हे बदलत्या काळाचे आणि जीवनमानाचे एक मूल्य वैशिष्ट्यच आहे, यात शंका नाही.
परवा एका डॉक्टर मित्राकडे गेलो. त्यांच्या डॉक्टर मुलाचे लग्न ठरले. अर्थात मुलगीही डॉक्टर आहे. ते गंमतीने म्हणाले की, ‘‘मी मुलाच्या लग्नापेक्षा त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. कारण एका वर्षानंतरच झालेले लग्न टिकते की नाही, याचा खरा अंदाज येणार आहे.
त्यामुळे आताच्या पेक्षा मोठा सोहळा त्या वेळी करायचा असं मी ठरवलं आहे.’ यातला गंमतीचा भाग सोडला, तरी एकूणच आजच्या विवाहसंस्थेच्या संदर्भात कोणते सुप्त भय मनी-मानसी टिकून आहे, याचा अंदाज या उदाहरणावरून येऊ शकतो.
या संदर्भात मला भर जवानीतलं बापूराव काकाच्या बोलण्यातील एक वाक्य आठवतं. ते म्हणायचे, ‘हे लग्न व्यवहाराचं काम म्हन्जे लय तकदीर ठोकून आस्ते. ज्याचं जूटलं त्याचं जूटलं.. ज्याचं फाटलं, त्याचं इचकलच समजा... तांगडतिंगाचं आस्ते बाप्पा हा एक... बाशिंगबळाच्या गोष्टी दैवयोगाचाच भाग आस्ते...’
हे खरंही होतं त्या काळात आणि खरंही आहे आजच्या काळात! पूर्वी लग्न ठरवता-जुळवताना उजवायला आलेल्या मुलीचे मायबाप जर्र जर्र व्हायचे. किती तरी मुलं पाहायला यायचे, पाहून जायचे. त्यांच्या होकाराची वाट पाहता पाहता नाकी नऊ यायचे.
मुलगी पसंत पडली तरी पुन्हा हुंड्याचा कातरकळा देणारा यक्षप्रश्न घायाळ-दग्ध करायचा. त्या काळातली व्यथा मांडणारी एक कविता आजही आठवते- या दीर्घ कवितेतल्या मुलीचं मनोगत व्यक्त करणाऱ्या काही ओळी अशा होत्या -
‘आले पाव्हणे पाह्याले आशी सजून बसते
कुंकवाचा टिळा लेता, पुढी आरसा लाजते
अशी सजून धजून, जाते पाव्हण्याच्या पुढी
मन वापीस येताना घेते आभाळात उडी...’
आणि भ्रमनिरास झालेल्या या कवितेचा शेवट होता -
‘माय निरोप आणते, पाव्हणे वापीस गं गेले
हुंडा द्याया नाही धन, बल काळजीनं बोले
वल्ल्या अंकुराची झाली, बाई मौत जन्माआधी
आलं वाळवंटी जिणं, पुन्हा भंगली समाधी!’
सुदैवाने, मुलीच्या मायबापाला जीवकाचणी देणारी ती हुंडापद्धती अपवादाने अस्तित्वात असली, तरी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या मुलाचं लग्न जुळून येणं आणि आपल्याला सूनमुख पाहायला मिळणं ही मायबापांसाठी आनंदाची बाब झाली आहे!