>> कर्नल अभय पाटवर्धन (सेवानिवृत्त)
ईशान्येकडील सात भारतीय राज्ये आणि हिंद महासागर क्षेत्राचा बांगलादेश एकमेव संरक्षक आहे हे मुहम्मद युनूस यांचे विधान आणि चीन व पाकिस्तानशी सामरिक, राजकीय संबंध वृद्धिंगत करण्याकडे झुकलेला त्यांचा कल हा बांगलादेश सरकारचा भारतविरोधी अजेंडा उजागर करणारा आहे. बांगलादेशला स्वतला हिंद महासागराचा रक्षक म्हणत असताना मुहम्मद युनूसनी तीन मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. एक म्हणजे भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेनेची पराम गाथा, दुसरे म्हणजे बांगलादेश पश्चिम, उत्तर व पूर्वेकडून भारताच्या 4000 किमीपेक्षा जास्त जमिनी सीमेने वेढलेला आहे आणि तिसरे म्हणजे बांगलादेश हे राष्ट्र भारत आणि भारतीय संरक्षण दलांच्या सौजन्याने अस्तित्वात आले आहे. त्यामुळे त्याला जाणीव करून देणे गरजेचे आहे की, ध्यान रहे, पैदा करनेवाले से तमीज से बात करते हैं!
भारताची ईशान्येकडील सात राज्ये भूपरिवेष्टित म्हणजेच लँडलॉर्ड आहेत. त्यांना हिंद महासागराशी संपर्क करण्यासाठी पर्यायच नाहीये. कारण या क्षेत्रात बांगलादेश हा हिंद महासागराचा एकमेव संरक्षक आहे, असे अतिशय वादग्रस्त विधान बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी अलीकडेच त्यांच्या चीनच्या दौऱ्यात केले होते. त्यानंतर त्यांनी चीनला बांगलादेशात येऊन निर्मिती उद्योग, व्यापार व वितरण केंद्रे व विमानतळ स्थापन करण्याचे आवाहन करून भारताच्या धोरणात्मक स्थितीला अप्रत्यक्ष आव्हान दिले.
या आवाहनानुसार बांगलादेश चीनच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करणारे साधन बनू शकतो. इथे आल्यास चीनसाठी वस्तू तयार करणे, त्यांची पी करणे, त्यांना चीनमध्ये परत घेऊन जाणे किंवा जगाच्या इतर भागांत निर्यात करण्याची एक मोठी शक्यता निर्माण होऊ शकते.
चीनपुढे लोटांगण
बांगलादेशमधील मोंगला बंदराचे आधुनिकीकरण करण्यासाठी चीन 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत करेल, असे आश्वासन चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मुहम्मद युनूसना दिले आहे. याव्यतिरिक्त चीन, चितगावच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास व विस्तार करण्यासाठी 350 दशलक्ष डॉलर्स आणि इतर निवडक तांत्रिक सहाय्यासाठी 150 दशलक्ष डॉलर्स देणार आहे. याच्याच जोडीला बांगलादेशने नद्यांच्या पाणी व्यवस्थापनासाठी चीनला दीर्घकालीन पाठिंबा मागत 50 वर्षीय सहाय्यता पॅकेज देण्याची विनंती केली. युनूस यांच्या मते, चीन जल व्यवस्थापन प्रवीण असल्यामुळे चिनी कौशल्यापासून बांगलादेशला बरंच काही शिकता येईल.
ईशान्येकडील सात भारतीय राज्ये आणि हिंद महासागर क्षेत्राचा बांगलादेश एकमेव संरक्षक आहे हे मुहम्मद युनूस यांचे विधान आणि चीन व पाकिस्तानशी सामरिक, राजकीय संबंध वृद्धिंगत करण्याकडे झुकलेला त्यांचा कल हा बांगलादेश सरकारचा भारतविरोधी अजेंडा उजागर करणारा आहे.
कट्टरतावादाचा कहर
दुसरीकडे भारतीय राज्यांमधे आतंक माजवणाऱ्या क्षेत्रीय व जातीय सशस्त्र संघटनांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणारा बांगलादेश, तेथील राजकीय पोकळीतून निर्माण झालेल्या इस्लामी व धार्मिक रूढीवादाकडे वळला आहे, असे म्हटल्यास ते चूक नसेल. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर तेथील धार्मिक कट्टरपंथीय संघटनांनी तरुणींच्या फुटबॉल खेळण्यावर बंदी घातली आहे. हिजाब, बुरखा घालून चेहरा, केस व अंग झाकणे अपरिहार्य केले आहे. सर्वांना शरीयत कायदा पाळण्याची सक्ती केली आहे. बांगलादेशात हिंदूंचा अपरिमित छळ होत आहे. त्यांच्या धार्मिक सणांवर बंदी व धर्मस्थानांची तोडफोड सुरू केली आहे. काही ठिकाणी जिझिया आकारणी सुरू झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुहम्मद युनूसच्या थेट संरक्षणाखालील बांगलादेश आता हळूहळू अल कायदा, इस्लामिक स्टेट, हिज्ब-उततहरीर, हिफाजत-ए-इस्लाम, हमास आणि इतर इस्लामी संघटनेतील जिहाद्यांच्या ताब्यात गेला आहे. ही कट्टरतावादी प्रािढया चिंताजनक आहे. कारण संयुक्त राष्ट्रसंघ शांती सेनेत महत्त्वाची भूमिका बजावणारी बांगला सेना, सशस्त्र अर्धसैनिक दल मूक प्रेक्षकाची भूमिका बजावताहेत.
या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषत ट्रम्प प्रशासनाने मुहम्मद युनूस यांची सल्लागार परिषद आणि अवैधानिक सरकारवर आवश्यक निर्बंध घालण्यासाठी योग्य ती पावले त्वरित उचलायला हवीत. अन्यथा पाकिस्तानची आयएसआय या देशाला लवकरच जिहादी आतंकवादाचा प्रमुख अड्डा आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचे मुख्य केंद्र बनवेल. बांगलादेशातील पावाढ पद्धतीने वाढणाऱ्या धार्मिक कट्टरतेमुळे येथील हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम अहमदिया आणि उर्वरित धार्मिक अल्पसंख्याकांचा अकल्पनीय छळ होऊन त्यांना भारतात किंवा इतरत्र आश्रय घ्यावा लागेल.
बांगलादेशच्या हालचाली
आज युनूस आणि बांगलादेशमधील काही अत्यंत प्रभावशाली व्यक्ती, उच्च सेनाधिकाऱ्यांना पाकिस्तानशी विनाअट दृढ संबंध हवे असल्यामुळे सरकारने आठ लाखांहून अधिक रझाकार पाकिस्तानी नागरिकांना बांगलादेशी नागरिकत्व प्रदान केले. त्यानंतर मुहम्मद युनूस आणि पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची दूरध्वनीवर चर्चा होऊन आधी न्यूयॉर्क आणि नंतर इजिप्तमध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट व चर्चा झाली. पुढील महिन्यात चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, शेहबाज शरीफ यांना भेटणार आहेत आणि जूनमध्ये मुहम्मद युनूस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी बांगलादेशने तुर्कस्तानकडून अत्याधुनिक ड्रोन्स घेतले आहेत. चीन पाकिस्तानला ‘जे 20’ ही फिफ्थ जनरेशन लढाऊ विमान देत आहे.
मोदी-युनूस भेट
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बिमस्टेक परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांची भेट झाली. ऑगस्ट 2024मध्ये ढाक्यात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि युनूस यांची ही पहिलीच भेट होती. मोदींनी त्यांना तेथील हिंदूंसह अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची सखोल चौकशी करण्यास सांगून वातावरण बिघडू शकेल असे वक्तव्य टाळण्याचे आवाहन केले. उलटपक्षी मुहम्मद युनूस यांनी शेख हसीनांचे प्रत्यार्पण, सीमा हत्याकांड, सार्क सहकार्य आणि प्रलंबित तिस्ता पाणी वाटप कराराचे मुद्दे मांडलेत. 2026 मध्ये होऊ घातलेला गंगा पाणीवाटप करार नूतनीकरण नीट पार पडावे म्हणून बांगलादेश सध्या भारताविरोधात काळजीपूर्वक पावले उचलतो आहे. या करारामुळे मिळत असलेला गंगा पाण्याचा इष्टतम वाटा त्यांच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुहम्मद युनूस यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान चीनच्या प्रस्तावित मेगा तिस्ता बेसिन विकास कार्पामाला होकार दिला नाही.
बांगलादेशची जलनाडी भारताच्या हाती
भारतासाठी सामरिकदृष्टय़ा अतिमहत्त्वाच्या चिकन नेक कॉरिडॉरला लागून असलेल्या संवेदनशील तिस्ता बेसिन क्षेत्रातील चिनी प्रवेश भारत कधीच मान्य करणार नाही. व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात भारतावर अवलंबून असलेल्या बांगलादेशात 54 भारतीय नद्या व मोठे नाले येतात. भारताच्या हाती त्यांची जलनाडी आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. बांगलादेश सरकारलाही या वास्तवाची जाणीव असल्यामुळे सध्या तरी ते सावधगिरी बाळगत आहेत, पण भविष्यात तो भारतावर डोळे वटारेल हे नक्की.
भारतातील सात पूर्वोत्तर राज्ये भूपरिवेष्टित आहेत म्हणून मुहम्मद युनूसनी चीनला बांगलादेशात यायचे जाहीर आवाहन केले हा प्रस्ताव मनोरंजक (इंटरेस्टिंग प्रपोझल) आहे. बांगलादेशमधे गुंतवणूक करण्यास चीन उत्सुक असेल त्याचे स्वागतच आहे. पण भारताची सात राज्ये भूपरिवेष्टित असण्याचा आणि या आवाहनाचा संदर्भ किंवा नेमके महत्त्व काय आहे हे अगम्य आहे, अशा शब्दांत भारतीय आर्थिक सल्लागार परिषद व परराष्ट्र मंत्रालयाने युनूसच्या उपरोक्त वक्तव्यांबद्दल निषेध केला. भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि श्रीलंका या बिमस्टेक देशांच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीत भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असून तो पाच बिमस्टेक सदस्यांशी सीमा सामायिक करतो आणि त्यांच्यापैकी बहुतांशांना एकमेकांशी जोडतो. भारताकडे बंगालच्या खाडीचा जवळजवळ 6,500 किमी लांबीचा सर्वात लांब किनारा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रस्तावित त्रिपक्षीय महामार्ग पूर्ण झाल्यावर भारताचा ईशान्येकडील प्रदेश हिंद महासागराशी जोडला जाईल.
चीनची मनीषा त्याच्या पूर्वेकडील बीआरआयचा पर्याय असलेला भारताचा त्रिराष्ट्रीय महामार्ग बांधण्यापासून रोखण्याची आहे. या त्रिराष्ट्रीय महामार्गाने म्यानमारमध्ये प्रवेश करून थायलंडला जाण्यासाठी बांगलादेश आणि मणिपूर हे दोन व्यवहार्य पर्याय आहेत. बांगलादेशने परवानगी न दिल्यास मणिपूर हा एकच पर्याय उरतो. म्हणून चीनला बांगलादेशात जागा हवी आहे आणि युनूस ती द्यायला तयार आहे. बांगलादेशमधील 15 कोटी लोकांच्या कट्टरपंथी इस्लामी जमावाचे उपद्रवी मूल्य ही मुहम्मद युनूसची खरी ताकद आहे. मुहम्मद युनूस यांचे वक्तव्य भारताविरोधात बांगलादेशात सुरू असलेल्या सखोल धोरणात्मक आणि दीर्घकालीन अजेंडय़ाला उजागर करणारे आहे. ईशान्येकडील राज्यांना मुख्य भूमीपासून भौतिकदृष्टय़ा वेगळे करण्यासाठी सिलिगुडी कॉरिडॉर हा महत्त्वाचा मार्ग तोडण्याचा धोकादायक सल्ला त्यांनी चीनला अप्रत्यक्षपणे दिला आहे, असा या वक्तव्याचा अर्थ आहे, असे संरक्षण तज्ञांचे मत आहे.
चिकन नेकचे महत्त्व
चिकन नेक किंवा सिलिगुडी कॉरिडॉर हा अरुंद भूभाग भारताच्या ईशान्य क्षेत्राला देशाच्या उर्वरित भागाशी जमिनी मार्ग, रस्ते व रेल्वेने जोडतो. या 60 किलोमीटर लांब पट्टय़ाची सर्वात अरुंद जागी रुंदी फक्त 20 किमी आहे. भौगोलिक आकारामुळे चिकन नेक नामाभिधान असलेल्या या पट्टय़ाच्या उत्तरेला नेपाळ व भूतान आणि दक्षिणेला बांगलादेश आहे. 1962 च्या युद्धात चीनने चिकन नेकवर थेट हल्ला केला नसला तरी त्याच्या जलद प्रगतीमुळे त्याची असुरक्षितता समोर आली. तसेच भविष्यात चीन केव्हाही या पट्टय़ावर कब्जा करू शकतो, अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे या भागात सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिसांना तैनात करण्यात आले. 2017 मध्ये चीनने डोकलाम क्षेत्रात घुसखोरी केल्यावर हे क्षेत्र परत एकदा चर्चेत आले. कारण तिबेटमधून रणगाडे येण्यासाठी डोकलामहून खाली येणारा ाढमवार उतार थेट या 20 किलोमीटर अरुंद भागात उतरतो. सिलिगुडी कॉरिडॉर आणि चीनधार्जिण्या बांगलादेशची जवळीक हा भारतासाठी खरा धोका आहे. त्यामुळे भारताला मापक प्रतिसाद देणे अपरिहार्य ठरते. यावर उपाय म्हणून भारतासाठी या क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवणे, चिकन नेकच्या खाली व आजूबाजूला अधिक मजबूत रेल्वे आणि रस्ते नेटवर्क विकसित करणे आणि असुरक्षित कॉरिडॉरला बायपास करून पर्यायी मार्गांचादेखील शोध घेणे अपरिहार्य आहे.
यासाठी सरकार काही उपाय करू शकते.
– राफेल लढाऊ विमान, ब्रह्मोस क्षेपणास्त्रs आणि एस 400 प्रणालींसारख्या प्रगत साधन संपत्तीने कॉरिडॉर मजबूत करून एक सक्षम संरक्षण रेषा बनवणे.
– सिलिगुडी कॉरिडॉरमधून 200 किमी लांब बॉम्बप्रूफ भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे.
– अंदमानमार्गे म्यानमारशी समुद्री मार्गा¬वरून किंवा खोलवर खालून जाणारा संपर्क साधणे.
– आसाम मुख्यमंत्र्यांनी वर्तविलेल्या मतानुसार, बांगलादेशला सर्व मार्गांनी कमकुवत करणे.
आज फिलिपाइन्स, व्हिएतनाम व मलेशियाचा एकमान्य शत्रू असलेल्या चीनविरुद्ध मोहिमेसाठी भारताने त्यांच्या लघु चौकोनी पथकातला चौथा सहभागी बनावे अशी इच्छा फिलिपाइन्सने व्यक्त केली आहे, पण चीनशी आमचे उघड शत्रुत्व नाही. त्यामुळे असे करून भारत हवेत गोळ्या झाडणार नाही हे भारताने स्पष्ट केले आहे. आजमितीला भारत पश्चिमेकडून पाकिस्तान, उत्तरेकडून चीन आणि पूर्वेला बांगलादेशच्या विळख्यात/गराडय़ात अडकला आहे. पुढेमागे युद्ध झालेच आणि ते होणारच, तर चीनच्या पुढाकारात आपल्याला तीन आघाडय़ांवरील युद्धाला तोंड द्यावे लागेल.
बांगलादेशला स्वतला हिंद महासागराचा रक्षक म्हणत असताना मुहम्मद युनूस यांनी तीन मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केले… अ) भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेनेची पराम गाथा, ब) बांगलादेश पश्चिम, उत्तर व पूर्वेकडून भारताच्या 4000 किमीपेक्षा जास्त जमिनी सीमेने वेढलेला आहे, आणि क) बांगलादेश भारत आणि भारतीय संरक्षण दलांच्या सौजन्याने अस्तित्वात आला. त्यामुळे त्याला जाणीव करून देणे गरजेचे आहे.