Success Story : भूम तालुक्यातील पार्थसारथी मुंढे हिची ज्युनिअर बिली जीन किंग कपसाठी भारतीय संघात निवड
esakal April 21, 2025 07:45 AM

धनंजय शेटे

भूम : भूम तालुक्यातील हिवर्डा येथील पार्थसारथी अरुण मुंढे हिची कझाकिस्तान येथे होणाऱ्या ज्युनिअर बिली जीन किंग कप या प्रतिष्ठीत टेनिस स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे.तिच्या समवेत ओडिशा येथील आहान व दिल्ली येथील आनंदिता उपाध्याय हे देखील भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हिवर्डा येथील अरुण मुंढे हे बीड येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक असून लेकीच्या खेळाची आवड जपण्यासाठी त्यांनी पुणे येथे पार्थसारथी हिस पी.वाय.सी. हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षणासाठी ठेवले आहे.

तिने टेनिस खेळाचे प्राथमिक धडे वयाच्या ६ व्या वर्षी सोलापूर येथे गिरवण्यास सुरुवात केली. सोलापूर येथे स्थानिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असल्याने खेळात विशेष सुधारणा करण्यासाठी पुणे येथे सुरुवातीस एक वर्ष डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला. नंतर पी.वाय.सी. हिंदू जिमखाना येथे गेल्या २ वर्षांपासून ती प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्पर्धात चमकदार कामगिरी करत आहे.

या जिमखान्याकडून खेळताना तिला स्पेन चा टेनिसपटू कारलोस अल्काराझ याचे प्रशिक्षक सॅम्युल लोपेज यांचे देखील मार्गदर्शन मिळाले. साल २०२३ व २०२४ मध्ये वैयक्तिक प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत सलग दोन वेळा १४ वर्ष वयोगटात उपविजेतेपद मिळवले तर २०२४ मध्ये तिने १६ वर्ष वयोगट वैयक्तिक व मिश्र तसेच १८ वर्ष वयोगटात राष्ट्रीय ज्युनिअर कप स्पर्धेत वैयक्तिक असे एकाच वर्षी तीन जेतेपदास गवसणी घातली.

तिने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीसाठी महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने प्लेअर ऑफ द ईअर चा पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले आहे. ती सध्या महाराष्ट्रातील क्रमांक १ ची टेनिसपटू असून तिचा भारतात १६ वर्ष वयोगटात ४ था तर १९ वर्ष वयोगटात १० वा क्रमांक आहे. ज्युनिअर बिली जीन किंग कप स्पर्धेसाठी भारताच्या कोलकत्ता येथील प्रसिद्ध कोच अमृता मुखर्जी या स्पर्धेत तिला मार्गदर्शन करणार असून १२ ते १७ मे दरम्यान ही स्पर्धा कझाकिस्तान येथे होणार आहे.

हिवर्डा गावात या बाबत माहिती मिळाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आले असून गावात दिवाळी सारखे आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे. पार्थसारथी ने ही स्पर्धा जिंकून देशाचे नाव उज्वल करावे हीच भावना गावातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद साजरा करताना दिसत होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.