Karnataka News : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. घरात ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पत्नीनेच हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिस दलही हादरून गेले आहे.
ओम प्रकाश हे बेंगलुरू येथील एसएसआर लेआऊट भागात आपल्या घरात असतानाच त्यांची हत्या झाली आहे. ते 1981 च्या तुकडीचे अधिकारी होते. कर्नाटक पोलिस दलात त्यांनी डीजीपी आणि आयडीपी ही पदे जवळपास दोन वर्षे भूषविली होती. 2017 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले होते. हत्येनंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.
बेंगुलुरू आयुक्त बी दयानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका धारधार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपास आढळून आले आहे. आज दुपारी 4 ते 4.30 दरम्यान आम्हाला त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याआधारे गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आतापर्यंत कुणालाही अटक कऱण्यात आलेली नाही.
ओम प्रकाश हे मुळचे बिहारमधील चंपारणमधील होते. त्यांनी भूविज्ञान विषयात एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. पैशांवरून दोघांमध्ये वाद होत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगा आहे. पोलिसांना पत्नीवर संशय असून तपास केला जात आहे. अद्याप हत्येबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे या हत्येचे गुढ वाढले आहे.