भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पुरुषांप्रमाणेच महिलांचेही योगदान आहे. यांपैकी एक असणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे नाव प्रमुख महिला क्रांतिकारकांमध्ये गणले जाते. कॅप्टन लक्ष्मी या भारतीय स्वातंत्र्य चळवळतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी आणि आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन होत्या. पेशाने डॉक्टर असणाऱ्या लक्ष्मी सहगल यांचा कॅप्टन होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
कॅप्टन डॉ. लक्ष्मी सहगल यांचा जन्म 24 ऑक्टोंबर 1914 रोजी एका तमिळ कुटूंबात झाला. त्यांचे वडील डॉ. एस. स्वामिनाथन हे मद्रास हायकोर्टात वकील होते. आई अम्मू स्वामीनाथन या स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या.
कॅप्टन सहगल यांनी 1932 मध्ये विज्ञान विषयात पदवी घेतली. 1938 मध्ये त्यांनी मद्रास कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आणि त्या 1939 मध्ये ‘स्त्री रोग तज्त्र चिकित्सक’ आणि ‘प्रसुतीतज्ज्ञ’ बनल्या. त्यांनी चेन्नई कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात काही दिवस नोकरी केली. त्यानंतर त्या सिंगापूरला गेल्या. तेथे गेल्यावर भारतातून स्थलांतर केलेल्या मजूरांसाठी त्यांनी दवाखाना उघडला.
1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जेव्हा ब्रिटिशांनी सिंगापूर जपानींच्या स्वाधीन केले, तेव्हा जखमी युद्धकैद्यांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. 1943 रोजी बोस सिंगापूर भेटीवर आले होते. येथे त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. सुभाषचंद्र बोस याच्या विचाराने प्रभावित त्या झाल्या आणि त्या आझाद हिंद सेनेत गेल्या. यानंतर अनेक महिलांनी सेनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. लक्ष्मी सेनेत सहभागी होताच आझाद हिंद फौजेची पहिली महिला रेजिंमेंट तयार करण्यात आली आणि त्याचे नाव ‘झाशीची राणी रेजिमेंट’ होते. ऑक्टोबर 1943 मध्ये डॉ. लक्ष्मी यांनी या रेजिमेंटमध्ये कॅप्टन म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या कॅप्टन नावाने प्रसिद्ध झाल्या. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून त्यांनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले. त्यांच्या अद्भूत कामगिरीमुळे त्यांना कर्नल पदही देण्यात आले होते. आशियामध्ये प्रथमच हे पद एका महिलेला देण्यात आले होते.
डॉ. लक्ष्मी यांनी मार्च 1947 मध्ये लाहोरमध्ये कर्नल प्रेम कुमार सहगल यांच्याशी लग्न केले आणि कानपूरमध्ये स्थायिक झाल्या आणि तेथे वैद्यकीय सेवा देऊ लागल्या.
पुढे त्या राजकारणातही सक्रिय झाल्या. 1971 मध्ये भारतीय कमुनिस्ट पक्षकडून राज्यसभेच्या सदस्य झाल्या. त्या अखिल भारतीय लोकशाही महिला संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीमध्ये त्या शीख कुटूंबे आणि विविध दुकानाच्या बचावासाठी पुढे आल्या. 1998 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
स्वातंत्र्यसैनिक, पेशाने डॉक्टर आणि भारतातील महिला चळवळीच्या नेत्या , कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे 23 जुलै 2012 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. एकदंरच, त्यांचे कार्य पाहता शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही ,अधिकार, समानता आणि स्त्री-मुक्तीसाठी लढा चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार चकित करणारा होता, एवढं मात्र नक्की…
हेही पाहा –