Pope Francis : निवाडा करणारा मी कोण?
esakal April 22, 2025 07:45 PM

आपल्या सुधारणावादी विचारांनी परंपरावाद्यांना धक्का, पण गरीब, दुर्लक्षित आणि पीडितांना दिलासा देणारे पोप फ्रान्सिस यांनी आपल्या तेरा वर्षांच्या कालखंडात अनेक धाडसी भूमिका घेतल्या होत्या. आपल्या प्रेमळ स्वभावाने टीकाकारांच्या मनातही आदराचे स्थान निर्माण केले होते. अनावश्यक टीकेवर ‘मौन’ हेच उत्तर असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. विविध परिस्थितींमध्ये त्यांनी लोकांना केलेली आवाहने आणि व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक ठरले आहेत.

मानवता आणि साधेपणा

ब्यूनोस आयर्स येथील आर्चबिशप असताना फ्रान्सिस यांनी या पदाला मिळणारे आलिशान जीवन त्यागून सार्वजनिक बससेवेद्वारे प्रवास करणे, स्वत:च अन्न शिजविणे आणि गरिबांच्या वसाहतींना नियमित भेटी देणे असे प्रकार सुरू केले. पोप बनल्यावरही त्यांनी हा साधेपणा कायम ठेवला होता.

स्थलांतरित

पोप फ्रान्सिस यांनी स्थलांतरीतांच्या हालअपेष्टांबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली. पोप बनल्यावर रोमबाहेरील पहिल्या दौऱ्यात त्यांनी स्थलांतरितांचीच भेट घेतली होती. निर्वासितांची समस्या वाढविणाऱ्या जागतिकीकरणाला त्यांनी विरोध केला होता. ग्रीसला गेले असताना त्यांनी त्यांच्या विमानातून बारा सीरियन मुस्लिम निर्वासितांना व्हॅटिकनला आणले होते. स्थलांतरितांना दूर ठेवण्यासाठी सीमेवर भिंत बांधणारा ख्रिश्चन असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकाही केली होती.

एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल...

पोप पदाच्या सुरुवातीच्या काळात एका समलिंगी ख्रिस्ती प्रचारकाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पोप फ्रान्सिस यांनी ‘निवाडा करणारा मी कोण?’ असे म्हणत या समुदायाला दिलासादायक भूमिका घेतली होती. दोन वर्षांपूर्वीही एका मुलाखतीवेळी त्यांनी समलिंगी असणे म्हणजे गुन्हा नाही, असे सुधारणावादी विचार व्यक्त केले होते आणि नंतर एका समलिंगी जोडप्याला आशीर्वादही दिले होते.

पर्यावरणवादी भूमिका

पर्यावरणाबाबत जनतेला संदेश देताना शास्त्रीय माहितीचा वापर करणारे फ्रान्सिस हे पहिले पोप होते. देवाच्या निर्मितीचे रक्षण करण्याचे त्यांनी वारंवार आवाहन केले. २०१५ मध्ये एक पर्यावरण जाहीरनामा प्रसिद्ध करताना पोप फ्रान्सिस यांनी गरिबांचे शोषण करणाऱ्या आणि पृथ्वीला कचराकुंडी बनविणाऱ्या आर्थिक रचनेत बदल करण्याचे आवाहन केले होते.

धर्मप्रचारकांकडून लैंगिक अत्याचार

चिलीमधील एका बिशपवर काही जणांना लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोप फ्रान्सिस यांनी २०१८ मध्ये बिशप यांची बाजू घेतली होती. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. पोप यांनी आपली चूक मान्य करत पीडित व्यक्तींना व्हॅटिकनला बोलावून घेत त्यांची माफी मागितली होती. तसेच, चिलीमधील सर्व बिशपना बोलावून घेत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. या घटनेनंतरही त्यांनी धर्मप्रचारकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यासाठी नवे कायदेही केले.

निवड होणारे पहिले

  • लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप

  • जेसुईट परंपरेतील पहिले पोप

  • सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्यानंतर फ्रान्सिस हे नाव धारण करणारे पहिले पोप

  • इराकला भेट देणारे आणि शिया पंथांच्या धर्मगुरुंची भेट घेणारे पहिले पोप

‘फ्रान्सिस’ हे नाव का स्वीकारले?

पोप म्हणून निवड झाल्यावर ‘फ्रान्सिस’ हे नाव का निवडले, अशी आठवण पोप फ्रान्सिस यांनी एका पत्रकाराशी बोलताना सांगितली होती. ‘‘माझी निवड झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कार्डिनल क्लॉडिओ ह्युम्स यांनी मला मिठी मारली. ते मला म्हणाले,गरिबांना विसरू नका’. त्यांचे हे शब्द माझ्या मनात फिरत असतानाच मला फ्रान्सिस ऑफ असिसी यांचे स्मरण झाले. ते शांतताप्रेमी होते. मला चर्चने गरिबांसाठी असावे, असे वाटत होते. म्हणून मी फ्रान्सिस हे नाव निवडले,’’ असे पोप यांनी सांगितले होते.

विशेष घडामोडी

  • रशियन परंपरावादी चर्चेचे प्रमुख पॅट्रिआर्क किरील यांच्याशी भेट. (१३ फेब्रुवारी, २०१६)

  • इजिप्तमधील सुन्नी पंथियांचे शिक्षणकेंद्र असलेल्या अल-अझरचे ग्रँड इमाम शेख अहमद अल तायेब यांच्याशी भेट. (२३ मे २०१६)

  • आपण सर्व समान आहोत, हे कोरोनाने आपल्या दाखवून दिल्याचे परखड मत व्यक्त (२७ मार्च, २०२०)

  • काही शतकांपूर्वी मूलनिवासी नागरिकांवर ख्रिस्ती धर्मियांनी केलेल्या अत्याचाराबद्दल जाहीर माफी. (२५ जुलै, २०२२)

  • समलिंगी असणे हा गुन्हा नाही. (२४ जानेवारी, २०२३)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.