(Hindi Compulsory) मुंबई : राज्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार आता पहिलीपासून मराठीसह हिंदी भाषेचीही सक्ती करण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. त्याबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या सक्तीला विरोध केला आहे. यावर, हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, चीन आणि जपानप्रमाणे स्वत:च्या भाषेवर जग चालवावे, असे आव्हान भाजपाला दिले आहे. (Sanjay Raut’s challenge to BJP)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या मताबद्दल विचारले असता खासदार संजय राऊत यांनी, भारतीय परराष्ट्र सेवेचा सर्व कारभार हिंदीतून करावा आणि चीन तसेच जपानप्रमाणे स्वत:च्या भाषेवर जग चालवावे. एवढी हिंमत भाजपात आहे का? असे आव्हानच दिले. देशाच्या संसदेचे पूर्णपणे हिंदीकरण करावे. संसदेमध्ये 70 टक्के लोक इंग्रजी बोलतात. त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा. संसदेच्या एका सत्रामध्ये करा, मग त्यांना कळेल, असेही ते म्हणाले.
भाषेचा एक वेगळा अजेंडा मुख्यमंत्री फडणवीस राबवू इच्छितात. तो अजेंडा देशात चालणार नाही. विशेष म्हणजे, यांच्या प्रत्येक अजेंड्यामागे निवडणुकीचे राजकारण असते. महाराष्ट्रातील लोकांना हिंदी येते. हिंदीचे हे जन्मस्थान नसले तरी, चित्रपट, नाटक, साहित्य कला, उद्योग यातून हिंदी ऐकली आणि बोलली जाते. ज्या हिंदी सिनेसृष्टीचा उगम जेथून होत आहे, त्या भागाला हिंदी शिकवायची गरज नाही. तुम्ही आमच्यावर हिंदी कशाला लादत आहात? असा प्रश्नही त्यांनी केला.
हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधाबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे आणि सर्वांनी ती शिकलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती भाषा देखील महाराष्ट्रात शिकता येते. पण मला विरोधकांचे आश्चर्य वाटते की, ते आता हिंदीला विरोध करीत आहेत, मग एवढे दिवस इंग्रजीला विरोध का नाही केला? इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा विरोधकांचा कोणता विचार आहे? आता हिंदीला विरोध होत असला, तरी कोणी मराठीला विरोध केला तर सहन केला जाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
हेही वाचा – Thackeray and Pawar : एकीकडे ठाकरे बंधू अन् दुसरीकडे काका-पुतण्या, पुन्हा मनोमिलन होणार?