दिल्ली कॅपिट्ल्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानात मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं आहे. लखनौला अप्रतिम सुरुवात मिळाल्यानंतरही 160 धावांचा आकडाही गाठता आला नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी कमबॅक केलं. त्यामुळे लखनौला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे आता लखनौला दिल्लीविरुद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड करायची असेल तर गोलंदाजांनाच चमत्कार करावा लागणार आहे. तर दुसर्या बाजूला दिल्ली सहाव्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दिल्लीने 24 मार्चला लखनौवर 1 विकेटने रंगतदार सामन्यात विजय मिळवला होता.
दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौच्या सलामी जोडीने या संधीचा पुरेपुर फायदा घेतला आणि टीमला अप्रतिम सुरुवात करुन दिली. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श या जोडीने 87 धावांची सलामी भागदारी केली. त्यानंतर लखनौला 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 87 धावांवर पहिला झटका लागला. एडन मारक्रम आऊट झाला. मारक्रम याने 33 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह सर्वाधिक 52 रन्स केल्या.
लखनौची त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली. एडमनंतर 12 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दिल्लीने लखनौला दुसरा आणि मोठा झटका दिला. मिचेल स्टार्क याने निकोलस पूरन याला 9 रन्सवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर बरोबर 2 ओव्हरनंतर लखनौने तिसरी विकेट गमावली. मुकेश कुमारने अब्दुल समद याला 2 धावांवर आऊट केलं. मुकेशने याच 14 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सेट असलेल्या मिचेल मार्श याचाही काटा काढला आणि लखनौला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. मार्श याने 36 बॉलमध्ये 45 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे दिल्लीची 87 आऊट 1 वरुन 14 ओव्हरनंतर 4 आऊट 110 अशी स्थिती झाली. दिल्लीने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 87 धावा केल्या. मात्र दिल्लीला त्यानंतर पुढील 5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून फक्त 31 धावाच करता आल्या.