पहलगाम इथं मंगळवारी दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला करण्यात आला. यात पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं असून जवळपास २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच द रेजिस्टेन्स फ्रंटने घेतलीय. दहशतवाद्यांना धर्म आणि नाव विचारून गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. अमरनाथ यात्रेच्या आधी झालेल्या या हल्ल्याच्या घटनेनं चिंता व्यक्त केली जात आहे.
एका पर्यटक महिलेनं सांगितलं की, दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला. भेळपुरी खात असताना शेजारी पती होता. एक दहशतवादी आला आणि त्यानं माझ्या हातात चुडा पाहिला. त्यानंतर पतीला धर्म विचारून गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ३ ते ५ मिनिटं गोळीबार केला आणि ते फरार झाले.
पहलगामच्या अशा भागात हल्ला झाला जिथं पर्यटक ट्रेकिंगसाठी जातात. या ठिकाणी वाहनं नेता येत नसल्यानं पायी जाणं किंवा घोड्यावरून जाणं हेच पर्याय आहेत. दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या या हल्ल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
बिगर मुस्लिम टार्गेटटीआरएफ ही दहशतवादी संघटना असून जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर उदयाला आलीय. पाकिस्तान पुरस्कृत जिहादी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाचं एक प्रकारे दुसरं नावं आहे. टीआरएफने नागरिक, अल्पसंख्यांक समुदाय, काश्मीरी पंडित, सरकारी कर्मचारी, पर्यटकांवर अनेक हल्ले केले आहेत. भारतीय सुरक्षा दलांवरही यांच्याकडून हल्ले करण्यात आलेत. टीआरएफ बिगरधार्मिक प्रतिकांचा वापर करून स्वत:ला धर्मनिरपेक्ष असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करते. मात्र काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो.
वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसवर हल्लाटीआरएफकडून याआधी २०१९ मध्ये श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. २०२० च्या जूनमध्ये काश्मीरी पंडित असलेल्या सरपंचाची हत्या तर सप्टेंबरमध्ये वकीलाची हत्या करण्यात आली होती. २०२१ मध्ये काश्मिरी पंडित व्यावसायिकाची आणि दोन शिक्षकांची हत्या करण्यात आली होती. २०२४ मध्येही टीआरएफने वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसवर हल्ला केला होता. यात ९ जणांचा मृत्यू झाला होता.