IPL 2025: लखनौने २७ कोटींना खरेदी केलेला Rishabh Pant पुन्हा शून्यावर आऊट! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
esakal April 23, 2025 09:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा ४० वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात एकाना स्टेडियमवर खेळवला गेला. मंगळवारी (२२ एप्रिल) या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला ८ विकेट्सने पराभूत केले.

दिल्लीचा हा ८ सामन्यांमधील ६ वा विजय आहे, तर लखनौचा ९ सामन्यांमधील हा चौथा पराभव आहे. दरम्यान, या सामन्यानंतर यंदाच्या हंगामातील रिषभ पंतचे अपयश प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यामुळे अनेक मीम्सही व्हायरल झाल्या.

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. लखनौकडून एडेन मार्करम आणि मिचेल मार्शने सुरुवात चांगलीही केली. त्यांनी सलामीला ८७ धावांची भागीदारी केली. मार्करमने ३३ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. तसेच मार्शने ३६ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकारासह ४५ धावा केल्या.

मात्र ते दोघे बाद झाल्यानंतर लखनौची फलंदाजी गडबडली. दिल्लीच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत त्यांना मोठे फटके मारण्यापासून रोखलं. तसेच निकोलस पूरन आणि अब्दुल सामद हे दोघेही झटपट बादही झाले. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि आयुष बडोनी डाव पुढे नेत होते.

पण आक्रमक खेळणाऱ्या बडोनीला शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुकेश कुमारने ३६ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर अगदी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याही तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर शून्यावर त्रिफळाचीत झाला.

रिषभ पंत दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला. तो याआधी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यातच शुन्यावर बाद झाला होता. त्याला ९ सामन्यात १०६ धावाच करता आल्या आहेत.

तो मंगळवारी शुन्यावर बाद झाल्यानंतर त्याला आयपीएल २०२५ साठी मिळालेल्या किंमतीवरून आणि सामद, मिलर, बडोनी यांच्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्यावरून मीम्स व्हायरल होत आहेत. रिषभ पंतला आयपीएल २०२५ साठी लखनौने २७ कोटींना खरेदी केले आहे.

दरम्यान, दिल्लीने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग लखनौने १७.५ षटकात २ विकेट्स गमावत १६१ धावा करत पूर्ण केला. दिल्लीकडून केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ५७ धावांची खेळी केली. त्याने ४२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ही नाबाद खेळी केली.

तसेच अभिषेक पोरेलने ३६ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच कर्णधार अक्षर पटेलने २० चेंडूत ३४ धावा केल्या. लखनौकडून गोलंदाजी करताना दोन्ही विकेट्स एडेन मार्करमने घेतल्या. तसेच दिल्लीकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.