मंगळवारी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी देशातील आणि परदेशातील पर्यटकांवर हल्ला केला. पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात साधारण २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातील अनेकांची ओळखही पटली आहे.
काही जणं गंभीर जखमी देखील आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकतर पर्यटक आहेत. साल २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा जम्मू-काश्मीरमधील मोठा दहशतवादी हल्ला आहे. या घटनेनंतर देशभरातून राग, संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
या हल्ल्यानंतर क्रिकेट वर्तुळातूनही हळहळ आणि निषेध व्यक्त होत आहे. भारताचा स्टार खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने लिहिले, 'पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून वाईट वाटलं. माझ्या प्रार्थना या हल्ल्यातील पीडितांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अशा हिंसाचाराला आपल्या देशात स्थान नाही.'
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने लिहिले की 'मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना याची किंमत मोजावी लागणार आहे. भारत हल्ला करेल.'
भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगनेही याबाबत पोस्ट केली, त्याने लिहिले, 'पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून खूप दुःख झालं आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. आशा आणि मानवते एकत्र उभे राहूया.'
याशिवाय देखील पार्थिव पटेल, आकाश चोप्रा, विरेंद्र सेहवागसह अनेक क्रिकेटपटूंनी या दहशदवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
या हल्ल्यानंतर जखमींना लगेचच हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. तसेच भारताचे गृहमंत्री अमित शाह लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यासह मंगळवारी संध्याकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पण या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आता ते हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहेत.