जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला आहे. बैसरन भागात हा हल्ला झाला असून, त्यात काहीजण जखमी झाल्याची बातमी आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "या घटनेमुळे मला धक्का बसला आहे. मला यावर विश्वास बसत नाही. आमच्या पर्यटकांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे."
आणखी एका पोस्टमध्ये ओमर अब्दुल्लाह यांनी लिहिलं आहे, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती गोळा केली जाते आहे.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपली प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, "जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. घटनेतील जखमी झालेले लोकं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो."
"पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडलं जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल," असंही मोदी म्हणाले.
राहुल गांधींची प्रतिक्रियाकाँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी म्हणाले, "जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची घटना निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे.
"आपल्या आप्तजनांना गमावणाऱ्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. घटनेतील जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो."
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, "दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. सरकारनं जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या थापा मारण्यापेक्षा योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी. जेणेकरुन अशा घटनांना आवर घालता येईल आणि निर्दोष भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)