सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या विमानतळाचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले. आता सात महिने संपत आहेत, तरीदेखील नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही. सोलापूरहून मुंबई, गोव्याला जाणाऱ्या विमानांसाठी तेथील विमानतळांवर स्लॉट देखील उपलब्ध झाले आहेत, पण आता विमान कंपन्या सेवा सुरू करण्यासाठी पुढे येण्याची प्रतीक्षा आहे.
सोलापूर विमानतळाचा सध्याचा रन-वे पाहता ४२ सीटर विमानसेवा येथून सुरू होऊ शकते, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापूर विमानतळाचा समावेश २०१६ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘उडान’ (उडे देश के नागरिक) योजनेतही आहे. राज्य सरकारने देखील कंपन्यांना प्रवाशांअभावी काही भुर्दंड बसला तर तो सहन करण्याची तयारी दर्शविली आहे. पूर्वी, गोवा-सोलापूर- मुंबई असा मार्ग निश्चित झाला होता, पण तो पुन्हा बदलला. आता सोलापूर- गोवा, सोलापूर- मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी अजूनही कंपन्या पुढे आलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मागील सात महिन्यांत सोलापूर विमानतळावर ५० हून अधिक खासगी विमाने उतरली आहेत. त्यातून विमानतळाला सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न (भाडे) देखील मिळाले आहे. पण, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर दोन ते सहा महिन्यांत विमानसेवा सुरू होईल, अशी सोलापूरकरांची अपेक्षा २० महिन्यांनंतरही पूर्ण झालेली नाही.
नाईट लँडिंगसाठी ५२ एकर जमिनीची मागणीसोलापूर होटगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी राज्य, केंद्र स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. नाईट लँडिंगसाठी विमानतळाला सुमारे ५५ एकर अतिरिक्त जमीन लागणार आहे. नाईट लँडिंगसाठी रन-वे वाढवावा लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ५५ एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर विमानतळ सध्या नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार असून गोवा, मुंबई विमानतळावर स्लॉट देखील उपलब्ध झाले आहेत. आता विमान कंपन्यांनी सहभाग घेऊन विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अजून काहीही डेव्हलपमेंट नाही.
- अंजनी शर्मा, सहायक सरव्यवस्थापक, सोलापूर विमानतळ