तुम्ही JEE Advanced परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, JEE Advanced 2025 साठी नोंदणी प्रक्रिया आज, 23 एप्रिलपासून सुरू केली आहे. महिला उमेदवार आणि एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरू शकतात. चला तर मग या JEE Advanced 2025 परीक्षेची संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा भरावा, याविषयी पुढे जाणून घेऊया.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), कानपूरने JEE Advanced 2025 साठी नोंदणी प्रक्रिया आज, 23 एप्रिलपासून सुरू केली आहे. उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार आहे. JEE Advanced 2025 मेन्समध्ये अव्वल क्रमांक मिळवणारे उमेदवार 2 मेपर्यंत jeeadv.ac.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तर, नोंदणीकृत उमेदवार 5 मे पर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतात.
JEE Advanced 2025 साठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 3200 रुपये निश्चित करण्यात आले आहे. महिला उमेदवार आणि एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरू शकतात.
JEE Advanced 2025 परीक्षा 18 मे रोजी IIT कानपूरने देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित केली आहे. परीक्षेला बसणाऱ्या सर्व यशस्वी नोंदणीकृत अर्जदारांना 11 मे रोजी प्रवेशपत्र देण्यात येईल, जे उमेदवार आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे डाउनलोड करू शकतील.
JEE Advanced 2025 ही परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतील. प्रत्येकाला तीन तासांचा अवधी असेल. उमेदवारांना दोन्ही पेपर द्यावे लागतील. प्रत्येक पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स असे तीन विभाग असतील. अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.