नवी दिल्ली : पुण्यातील ‘राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ (एफटीआयआय) तसेच कोलकता येथील ‘सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ (एसआरएफटीआय) यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला जात असल्याची घोषणा शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. ‘एफटीआयआय’ ही माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारित काम करीत असलेली नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तत्कालीन माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘एफटीआयआय’ला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चा दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबत पुढे काही झाले नव्हते. आता अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे केवळ पदविकाच नव्हे तर डॉक्टरेट श्रेणीचे कोर्सेस उपलब्ध करून देणे दोन्ही संस्थांना शक्य होणार आहे. याशिवाय संशोधन आणि विविध शैक्षणिक प्रकल्पही राबविता येतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कलम-३ नुसार उभय संस्थांना हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ (आयआरएफ) क्रमवारीत सामील होण्यासाठी देखील यामुळे मदत होणार आहे.
नव्या धोरणामुळे स्वायत्तताराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध शिक्षण संस्थाना जास्तीत जास्त स्वायत्तता दिली जात आहे. ‘एफटीआयआय’ आणि ‘एसआरएफटीआय’ या संस्थांना देण्यात आलेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा हा त्याचाच भाग मानला जात आहे. ‘एफटीआयआय’ला हा दर्जा बहाल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. माहिती आणि नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याला दिलेल्या भेटीवेळी अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी तसेच शिक्षकांची मते जाणून घेतली होती.