भारत आणि पाकिस्तान हे दोन शत्रू देश समजले जातात. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून या दोन देशातील संबंध बिघडले आहेत. नुकताच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर परिस्थिती आणखी चिघळली आहे. अशात भारत-पाकिस्तान यांच्यात कोणत्याच प्रकारचे क्रिकेट खेळले जाऊ नये अशा मागण्याही होत आहेत.
जवळपास दशकापासून या दोन देशात द्वीपक्षीय मालिका होत नाहीत, फक्त आयसीसी आणि आशियाई स्पर्धेतच हे दोन संघ आमने - सामने असतात. याशिवाय (IPL) पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्यापासून बीसीसीआयने बंदी घातली आहे.
अशातच आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने आश्चर्यकारक दावा केला आहे. त्याने खुलासा केला आहे की तो पुढच्यावर्षी आयपीएल खेळण्याच्या जवळ आहे. त्याने म्हटले आहे की जर संधी मिळाली, तर पाकिस्तान सुपर लीगपेक्षा (PSL) तो आयपीएल खेळण्याला प्राधान्य देईल.
सध्या अमीर क्वेट्टा ग्लाडिएटर्स संघाकडून खेळत आहे. पीएसएल आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धा एकाचवेळी सध्या सुरू आहेत. याचदरम्यान, जिओ न्यूजशी बोलताना अमीरला यापुढेही आयपीएल आणि पीएसएल स्पर्धेचं वेळापत्रक एकावेळी आलं, तर एका स्पर्धेची निवड करण्यास सांगण्यात आले. त्यावर त्याने थेट उत्तर देताना आयपीएलचं नाव घेतलं.
तो म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचं, तर मला संधी मिळाली, तर मी नक्कीच आयपीएल खेळेल. मी हे अगदी खुलेपणाने सांगतोय. पण जर मला तिथे संधी नाही मिळाली, तर मी पीएसएल खेळेल. पुढच्या वर्षापर्यंत मला आयपीएल खेळण्याची संधी मिळू शकते आणि जर मला ती संधी मिळाली, तर मी का नको खेळू. मी आयपीएलच खेळेल.'
तो पुढे म्हणाला, 'मला वाटत नाही की आयपीएल आणि पीएसएल पुढच्या वर्षी एकाचवेळी होईल. यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होती, त्यामुळे तसं झालं. जर मला आधी पीएसएलमध्ये निवडलं गेलं, तर मी माघार शकणार नाही, कारण माझ्यावर स्पर्धेसाठी बंदी घातली जाईल. जर मला आयपीएलमध्ये पहिल्यांदा निवडले गेले, तर मी त्या लीगमधून माघार घेऊ शकणार नाही. आता मला कोणत्या स्पर्धेसाठी आधी निवडले जाणार यावर हे अवलंबून आहे.'
'जर आयपीएलचा लिलाव आधी झाला आणि माझी निवड झाली, तर मी पीएसएल खेळणार नाही. पण जर पीएसएलचा ड्राफ्ट आधी आला आणि मला निवडलं गेलं, तर मी या स्पर्धेतून माघार नाही घेणार.'
दरम्यान, अमीर जरी पाकिस्तानी खेळाडू असला, तरी त्याची पत्नी युकेची नागरिक आहे. त्यामुळे त्यानेही युकेचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला आहे. जर तो अर्ज मंजूर झाला, तर तो युकेचा नागरिक होईल आणि त्याच्यासाठी नियमानुसार आयपीएल खेळण्याचे दरवाजे उघडतील.
पाकिस्तानव्यतिरिक्त इतर देशाचे नागरिक असलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी आहे. मात्र, आता गेल्या काही वर्षात दोन देशातील बिघडलेले संबंध लक्षात घेता, त्याचा आयपीएलसाठी संघ विचार करतील, याची शक्यता कमी आहे.