नाशिक : जम्मू काश्मीरच्या घाटात फिरायला गेलेल्या नाशिकच्या पर्यटकांच्या सहलीचं रूपांतर काही क्षणातच थरार आणि भीतीने भरलेल्या दु:स्वप्नात झालं. पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हे पर्यटक केवळ नशिबाने बचावले. मॅगी खाण्याच्या एका क्षुल्लक निर्णयामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले आहे. हाच थरारक अनुभव नाशिकरांनी सांगितला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना सागर चौगुले, अनिकेत कोठुळे आणि सागर कोठुळे या पर्यटकांनी आपला अनुभव अत्यंत थरारक शब्दांत सांगितला आहे. हल्ल्याच्या क्षणी चे हे पर्यटक हल्ल्याच्या अगदी जवळपास होते. भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल हे या पर्यटकांच्या अगदी पुढे चालले होते. काही क्षणातच गोळीबार सुरू झाला. वातावरणात एकच सैरभैर उडाली. लोक इकडे तिकडे धावू लागले, असं त्यांनी सांगितलं.
स्थानिक लोकांनी घाबरलेल्या स्वरात सांगितलं की, 'दोन लोग दफन हो गये', हे ऐकताच आम्ही तिथून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांनी महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने, कपाळावरील टिकली काढायला लावली. हिंदू ओळख टाळण्यासाठी डोळ्यांत सुरमा घालण्यास, बुरखा परिधान करण्यास सांगितलं गेलं. 'हिंदू नाव अजिबात सांगू नका', असं त्यांनी म्हटलं होतं. हल्ल्याचे भय एवढे तीव्र होते की, आमच्यासोबत असणाऱ्या काही महिला अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत आणि त्या आजारी पडल्या आहेत.
तर धक्कादायक प्रसंगातही एक विलक्षण घटना घडली, जिच्यामुळे पर्यटकांचे प्राण वाचले. 'आम्ही पुढे निघणार होतो, पण आम्ही खाल्लेली मॅगी आम्हाला खूपच आवडली, म्हणून पुन्हा मॅगी खाण्यासाठी आम्ही थांबलो आणि त्याचवेळी समोर हल्ला झाला. जर ती मॅगी खायला थांबलो नसतो, तर आम्ही त्याच ठिकाणी असतो, जिथे गोळीबार झाला,' असं पर्यटकांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा प्रसंग पर्यटकांच्या मनावर इतका खोलवर कोरला गेलाय की, या पर्यटकांनी आता पुन्हा कधीही काश्मीरला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.