भंगारामुळे गोदामात अग्निकांड
esakal April 27, 2025 07:45 AM

पंढरीनाथ कुंभार ः सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. २६ : शहरात कागदाच्या रद्दीपासून धातूंच्या निकामी वस्तूंच्या भंगार खरेदीतून लाखोंची उलाढाल होते. अनेक गोदामांमध्ये अशा वस्तुंचा साठा केला जात असून शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे कोणताही अंकुश नसलेली ही गोदामे आगीचे भक्ष्य बनत आहेत.
शहराबाहेर अथवा गावकुसाबाहेर मोठ्या भंगार व्यावसायिकांची गोदामे आहेत. शहरी भागातआरोळ्या देत घराघरातून, दुकानातून अथवा कंपनीतून भंगारवस्तू, रद्दी गोळा करणाऱ्या फेरीवाल्यांकडून भंगार माल खरेदी करीत असतात. साठवलेले भंगार पुनरुत्पादनासाठी विविध गोदामात पाठविले जाते. या भंगारात रद्दी, पुठ्ठा, खोके, प्लॅस्टिकच्या वस्तू, ड्रम, लोखंडाबरोबर अल्युमिनियमसह धातू साठवलेले असतात. मात्र, आता त्यात रसायनांच्या ड्रमची भर पडली आहे. ही रसायने आगीशी संपर्कात आल्याने गोदामांना आग लागते. महत्त्वाचे म्हणजे, हा व्यवसाय शासकीय यंत्रणा आणि स्थानिक पुढाऱ्यांचा आशीर्वादाने सुरू असून आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नसल्याने लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.
----------------------------------------------------
व्यवसाय रामभरोसे
- भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील भंगाराची गोदामे मोठ्या संख्येने एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आहे. यापैकी गोदामास आग लागल्यास प्रथम भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाला जावे लागते. ग्रामीण भागात लागलेली आग विझविण्यासाठी बऱ्याचवेळा ठाणे, कल्याण आदी महापालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. पण राज्य सरकारने एमएमआरडीएचे स्वतंत्र अग्निशमन पथक स्थापन केले, तरच अशा क्षेत्रातील आगीच्या घटना कमी होऊन व्यवसायांना शिस्त लागेल.
- अशा प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीमधून ना हरकत दाखल्याबरोबर अग्निशामक दलाचा दाखला घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील व्यवसायासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात नाही. तसेच ही जबाबदारी कोणत्याही शासकीय कार्यालय स्वीकारत नाही. त्यामुळे सध्या शहर आणि ग्रामीण भागात भंगाराचा व्यवसाय रामभरोसे सुरु आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
अनेकदा भंगाराच्या दुकाने अथवा गोदामे यांची दुकाने पक्की बांधकामाची नसतात. त्यामुळे त्यांना अग्निशामक दलामार्फत ना हरकत दाखला देता येत नाही. भिवंडी महापालिकेचे अग्निशामक दल असल्याने ग्रामीण भागात असे दाखले देता येत नाही. गेल्या वर्षभरात शहर तसेच ग्रामीण भागात एकूण ३१५ आगी लागल्या असून त्यापैकी सुमारे ४० भंगाराच्या गोदामास आग लागलेल्या आहेत.
- राजेश पवार, प्रभारी मुख्य अग्निशामक दल प्रमुख, भिवंडी महापालिका
-------------------------------------------------------------------------------------------------------------
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून स्थानिक ग्रामपंचायत सर्व व्यवहार पाहत असतात. त्यामुळे गावात व्यवसाय अथवा इतर परवानगी अथवा ना हरकत दाखला ग्रामपंचायतीमार्फत दिला जातो. परंतु, अग्निशमन दल ग्रामपंचायतीकडे नसल्याने हा दाखल ते देऊ शकत नाही. यासाठी ग्रामीण भागाचा विकास होत असताना अग्निशामक दलाची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
- सुदाम इंगळे, सहा. गटविकास अधिकारी भिवंडी पंचायत समिती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.