आठवणी सुट्टीच्या
esakal April 27, 2025 09:45 AM

- ऋचा थत्ते, rucha19feb@gmail.com

परीक्षा जवळ आल्यावरच सुट्टीत काय करायचं, याचे प्लॅन्स मनातल्या मनात आखले जायचे. दर सुट्टीत नवीन काहीतरी शिकायला तर आवडायचंच मला. कायमस्वरूपी आठवण राहते म्हणून आणि ताजंतवानं वाटतं म्हणूनही. वेळ सत्कारणी लागला यासारखं खरंच दुसरं समाधान नाही.

आम्ही नव्वदच्या दशकातील मुलं म्हणजे ‘गॅजेटफ्री’ असलेलं आमचं सुखी बालपण. काही दिवस आजीकडे राहायला जायचं हे तर ठरलेलंच असायचं. मग ती शिकवायची काय काय. तिच्याकडे एक शिवणयंत्र होतं. एक रुमाल आणि एक पिशवी शिवली होती त्यावर. मशीनच्या सुईत दोरा ओवणं, पाय मारणं, चाक फिरवणं, कापड नेमकं सरकवणं आणि आपले हात सुईपासून सांभाळत काम करणं अशा कितीतरी गोष्टी होत्या.

पुढे हे जरी तेवढ्यापुरतंच राहिलं तरी त्या त्या वेळी अशा वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्यात आनंद खूप मिळायचा.

सुट्टीचे दिवस म्हणजे अर्थातच अगदी बालवाडीपासून ते पदवीपर्यंत! त्यामुळे साहजिकच प्रत्येक सुट्टीत वर्षागणिक शहाणी आणि समंजस होत गेली.

आजीच्याच सुट्टीच्या शिबिरात अशा कितीतरी गोष्टी शिकले मी. त्यात एक तर सागरगोटे खेळणं. सात सागरगोटे जमिनीवर टाकायचे. मग एक वर फेकायचा, खालून एक उचलायचा आणि वर गेलेला हातात झेलायचा. हे करताना इतर सागरगोट्यांना धक्का लावायचा नाही.

आणि मग दोन-दोन, तीन-तीन असं करीत उचलत जायचे. डोळ्याचे आरोग्य आणि एकाग्रता यासाठी उत्तम खेळ. असंच बिट्ट्यांनीही खेळता येतं. आजही स्क्रीनटाइम वाढल्यावर आलेला ताण कमी करण्यासाठी मी सागरगोटे खेळते.

तसंच चित्र काढून त्यात शंखशिंपले चिकटवणं किंवा चहाच्या खोक्यातील चंदेरी पिशव्यांचा हार करणं हे उद्योगही मी तिच्याबरोबरच केले होते. कागद भिजवून त्याची भांडी आणि मातीची भांडी असे फार सुबक नसले तरी आनंददायी प्रयोग मी आजोळीच केले.

तसंच माझं दुसरं आजोळ म्हणजे ताथवडे. या आजीनं मला गॅस पेटवून चहा करायला शिकवला तो चौथीतच. आश्चर्य वाटेल, पण हे त्या वेळी खेड्यासारखं असल्याने कोंबडीची पिल्लं हातात धरण्याचा आनंद घेतला. दारात असलेला जॅकी त्याच्याशीही छान गट्टी झाली होती.

फुलझाडांवरचे चतुर आणि फुलपाखरं यांचं भरउन्हात निरीक्षण करताना भान हरपायचं. इतकंच काय विहिरीत बादली सोडून रहाटानं पाणी काढण्याचाही आनंद घेतला. चुलीवरचं जेवण अनुभवलं. डांगे चौकात जाऊन अनुभवलेला रविवारचा बाजार हा पुण्याच्या तुळशीबाग किंवा मंडईपेक्षा खूप वेगळा वाटायचा. पडवी, ओसरी, कोनाडे असलेलं हे कौलारू घर. हे वातावरणच फार आवडायचं मला. सगळीकडे हुंदडून दमल्यावर एका कोपऱ्यात निवांत वाचनाची मजा काही औरच.

अवांतर वाचन करायला मला तर आवडायचंच. चंपक, ठकठक, चांदोबाचे अंक. स्वामी, एक होता कार्व्हर, पाडस अशी कितीतरी पुस्तकं वाचली असतील. गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर असा एक संच आणि साने गुरुजींच्या गोड गोष्टी हाही एक संच फार आवडीचा होता. जादूच्या गोष्टी तर अहाहा. कल्पनेला नक्कीच चालना मिळते त्याने.

पुस्तकांशिवाय अजून कशाचा आस्वाद घेतला असेल, तर बालनाट्य आणि बालचित्रपट! थोडी मोठी झाल्यावर सोसायटीतील मित्र-मैत्रिणींबरोबर मी जाऊ लागले. बस रिक्षाने जाणं-येणं. रांगेत उभं राहून तिकीट काढणं. इंटरव्हलमध्ये खाऊ घेणं आणि या खर्चाचा नीट हिशोब करणं असं शिक्षण नकळत घडलं. बालनाट्य आताही पाहतातच मुलं; पण त्या वेळी मुलांसाठी मनोरंजनाची फार साधनं नसल्यामुळे त्याचं खूपच अप्रूप होतं.

तसंच पर्वती, सारसबाग हीसुद्धा आमची फिरायला जाण्याची आवडीची ठिकाणं. आणि दुपारच्या वेळेस पत्ते, कॅरम, भेळपार्टी असे नानाविध उद्योग. शिवाय काकडी, तिखट मीठ लावलेली कैरी, पन्हं, कुल्फी, पेप्सीकोला आणि यावर नको नकोचा ओरडा ऐकत प्यायलेलं माठातील पाणी! कुणाकडे वाळवण असेल तर मिळालेली लाटीची खिरापत. याही गोष्टीत काय आनंद असायचा. असंच आम्ही बाहुलीचं लगीनही अगदी झोकातच लावायचो. मेंदी, रुखवत, वरात, अक्षता ते जेवणाची पंगत आणि पाठवणीसुद्धा!

मात्र करायला न आवडणारी गोष्ट होती ती म्हणजे शुद्धलेखन. बाईंनी एका सुट्टीत शुद्धलेखन लिहायला सांगितलं होतं. तेही पाच ओळी नव्हे, तर पाच वाक्यं. म्हणजेच पाच पूर्णविराम यायला हवेत. सात-आठ किंवा दहा-बारा ओळी होतील ही त्यांची अपेक्षा. पण मी महाचलाख! एका गोष्टीच्या पुस्तकातून अशी पाच वाक्य शोधली, की विचारू नका.

आजही मला पाठ आहेत. दोन महिने लिहिली होती ना! तुम्हीच वाचा म्हणजे कळेल - ‘एक होता बंटी. छोटा. दहाबारा वर्षांचा. खूप खेळकर. तसाच खोडकर.’ झालं पाच वाक्यं संपली. जेमतेम दोन ओळी पुरल्या. बाईंनी कपाळावर हात मारला हे वेगळं सांगायलाच नको.

अर्थात सुट्टी जितकी सार्थकी लागेल, तेवढी ती आपल्याला घडवणारी ठरते आणि कायमची आठवणीत राहते. सुट्टीत काहीतरी नवीन शिकायचं हा जणू अलिखित नियम होताच. आणि इतक्या वर्षांत खूप काही शिकत आले.

त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायकल. आपल्यापैकी खूप जण कदाचित सायकल सुट्टीत शिकले असतीलच. माझ्यासाठी ही खास आठवण. कारण मला शिकण्यासाठी आधी एक सेकंडहँड सायकल आणली होती. पण ती उंच असल्याने फार भीती वाटायची.

म्हणून मी जवळच्याच दुकानातून पाय टेकतील अशी कमी उंचीची भाड्याची सायकल आणली. तासाला फक्त एक रुपया. आणि झालं की दोन तासांत माझा मला बॅलन्स जमला. दुसऱ्या दिवशी मोठी सायकलही एकटीच चालवू लागले. आणि सायकल शिकण्याचा उपयोग मात्र मला अनेक वर्षे झाला. शाळा-काॅलेजला जाताना आणि व्यायाम म्हणूनही.

वेगवेगळ्या शिबिरांना जाण्याचाही आनंद बरेचदा घेतला. शाळेपेक्षा हा आनंद वेगळाच असतो. आताही काळानुरूप खूप वेगवेगळ्या विषयांवर छान शिबिरं होतात. ती मुलांना नक्कीच वेगळ्या वातावरणात नेऊन त्यांना चालना देऊ शकतात.

त्या वेळी व्हिडिओ हे माध्यमच नसल्यामुळे चक्क उदबत्ती, मेणबत्ती, मोत्याचे दागिने, अत्तर बनवणे, कागदाची फुलं, सिरॅमिक, चाॅकलेट इतके सगळे प्रकार क्लासला जाऊन शिकले होते. मला हौस आणि आईचं प्रोत्साहन. आचाचं माझं क्षेत्र पाहिलं आणि ते दिवस आठवले की हसूही येतं.

पण म्हणतात ना, कुठलीही गोष्ट वाया जात नाही. तसंच झालं. यातील काही वस्तू तर मी ऑर्डर घेऊन वगैरे विकल्या. अर्थातच ओळखीच्या आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांनी कौतुक आणि प्रोत्साहन म्हणून घेतल्या असतील.

पण त्यामुळेच सामान आणण्यापासून तयार करण्यापर्यंत आणि सुबक पॅकिंग करून विकण्यापर्यंतचा सगळा अनुभव गाठीशी जमा झाला. खर्च किती, नफा किती आणि याची पूर्ण प्रक्रिया व मेहनत किती हे व्यवहारज्ञान यामुळे होऊ शकलं.

जाता जाता अजून एक आठवण झाली, ती गजऱ्याची. आई मोगऱ्याची फुलं आणायची. दोऱ्यात सुई ओवण्यापासून गजरा पूर्ण करायलाही मी सुट्टीतच शिकले. एक काम एका जागी बसून पूर्ण करणं यालाही चिकाटी हवी हे कळलं.

आणि आता हे लिहीत असताना वाटलं, की आताही आपण सुट्टीच्या आठवणींची फुलंच तर ओवत गेलो या लेखात. या आठवणींचा दरवळ कित्येक वर्षे मनात होताच. तो आता शब्दातही उतरला. हा शब्दगंधही दरवळत राहील पुढची अनेक वर्षं! खरंय ना?

एप्रिल महिना सुरू झाल्यावर शाळेची परीक्षा आणि सुट्टी याची आठवण आली नाही असं आजही होत नाही. त्या वेळेस ‘मग आता काय करणार सुट्टीत’ हा प्रश्न ठरलेला असायचा आणि तसंच शाळा सुरू झाल्यावर ‘सुट्टीत काय केलं’ असं तर बाई विचारायच्याच... शाळा-काॅलेजच्या जशा आठवणी असतात तशा सुट्टीच्याही कितीतरी आठवणी. त्यावरून कदाचित बहुतेकांना आपली सुट्टी आठवेलच. कोणत्या काळात शिक्षण झालं, त्यानुसार या आठवणींचे रंग वेगळे असतील.

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.