जायकवाडी : पैठण एमआयडीसीतील इनकोअर हेल्थ केअर फार्मा कंपनीत शनिवार (ता.२६) रोजी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन कामगार जखमी झाले. रामदास जगन्नाथ बडसल (वय ५५, रा. सेंटपॉल, मुधलवाडी) यांचा असे मृताचे नाव आहे.
पैठण एमआयडीसीमधील इनकोअर हेल्थ केअर फार्मा कंपनीच्या दुसऱ्या मजल्याला शनिवारी दुपारी २.४५ च्या सुमारास आग लागली. ही आग शमविण्यासाठी अग्निशामक दल छत्रपती संभाजीनगर, एमआयडीसी पैठण, पैठण नगर परिषदेसह खासगी टँकरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आली. या घटनेत कंपनीच्या मेंटेनन्स विभागाचे कामगार रामदास जगन्नाथ बडसल (वय ५५, रा. सेंटपॉल, मुधलवाडी) यांचा मृत्यू झाला. तसेच, कंपनीतील दोन कामगार रामदास बोंबले पाचलगाव व सारंगधर गव्हाड (रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे किरकोळ जखमी झाले.
याबाबत एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात कंपनीचे अधिकारी तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी घटनास्थळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक संभाजीराव झिंजुर्डे, पोलिस जमादार राहुल मोहोतमल, कृष्णा उगले,कर्तारसिंग सिंगल, खंडू मंचरे यांच्यासह आदी उपस्थित होते. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलिस जमादार राहुल मोहोतमल करीत आहेत.
एमआयडीसी पैठण येथील इनकोअर हेल्थ केअर कंपनीला आग लागल्याची घटना कळताच आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमन दल, पोलिस प्रशासन, कंपनी व्यवस्थापनाला सूचना केल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भाऊ लबडे, उपसरपंच बाळासाहेब म्हस्के, नामदेव खराद, नितीन एरंडे, अनिकेत धारकर, सतीश लबडे आदी उपस्थित होते.