आयपीएल 2025 मधील 45 व्या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईचं तर ऋषभ पंतकडे लखनौच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. लखनौने टॉस जिंकला. कर्णधार ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता पलटणला बॅटिंगची संधी मिळाली आहे. त्यामुळे पलटण लखनौ विरुद्ध किती धावा करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनौ आणि मुंबई दोन्ही संघांना या सामन्याच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेइंग ईलेव्हनमधून लोकल बॉय असलेला ऑलराउंडर शार्दूल ठाकुर बाहेर झाला आहे. त्याच्या जागी मयंक यादव याचा समावेश करण्यात आला आहे. शार्दूलला वानखेडे स्टेडियमची संपूर्ण माहिती आहे. मात्र त्यानंतरही शार्दूलला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. त्याला दुखापत आहे की डच्चू दिलाय? हे कॅप्टन पंतने सांगितलं नाही. मात्र ठाकुर नसल्याने मुंबईसाठी हा दिलासा आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. कॅप्टन हार्दिकने मिच सँटनर याच्या जागी कर्ण शर्मा याला संधी दिली आहे. तर युवा विघ्नेश पुथूर याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी कॉर्बिन बॉश याला संधी देण्यात आली आहे. कॉर्बिनचं यासह पदार्पण झालं आहे.
दरम्यान मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांचा हा या मोसमातील दहावा सामना आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांचा 4-4 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. दोन्ही संघ या हंगामात 4 एप्रिलनंतर पु्न्हा एकदा आमनेसामने आहेत. लखनौने मुंबईला 4 एप्रिलला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पलटणकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. पलटण या प्रयत्नात किती यशस्वी ठरते? याकडे चाहत्यांची नजर असणार आहे.
लखनौच्या बाजूने टॉसचा कॉल
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि कर्ण शर्मा.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अब्दुल समद, आयुष बडोनी, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव आणि मयंक यादव.