Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात एका वेगळ्या चर्चेने जोर धरला आहे. मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीबाबत सध्या वेगवेगळी चर्चा चालू आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील या युतीबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सकारात्मक विधानं केली आहेत. त्यामुळेच या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या चर्चेनंतर पवार कुटुंबीयांनीही एकत्र यावं, असं आवाहन पवार घराण्यातील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं होतं. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील याला सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. यावरच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकेर हे लहानपणापासून एकत्र आहेत. आऊ साहेब आणि बाळासाहेब ठाकरे राजावर सर्वात जास्त प्रेम करत होते. राजा म्हणजे राज ठाकरे. पण राजकारणामुळे थोडी दरी झाली. सर्व घराण्यांनी एकत्र यावे. पवार कुटुंब पण एकत्र यायला पाहिजे. तसं झालं तर मला त्याचा आनंदच होईल, अशी थेट प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी सभेत बोलताना मी अडीच वर्षांनी नव्या लोकांना मंत्रिपद देण्याचं सांगितलं होतं. मी माझा हा शब्द पूर्ण करणार आहे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता कोणत्या नव्या नेत्यांच्या गळ्यात भविष्यात मंत्रिपदाची माळ पडणार, असे विचारले जाऊ लागले आहे. महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. याआधी ते अनेक वर्षे मंत्री, उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी मात्र त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेल्या ताज्या विधानाबाबत भुजबळ यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना, “मी काय करू. अजित पवार यांनी ते विधान केलं आहे, तर ते बघतील. याबाबत त्यांनाच विचारा,” अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.