वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ट्राय सीरिज 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने यजमान श्रीलंकेवर आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंका वूमन्स टीमने विजयासाठी महिला ब्रिगेडसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पावसामुळे 11 षटकारांचा खेळ कमी करण्यात आला. मात्र त्यानंतरही श्रीलंकेला संपूर्ण 39 ओव्हर खेळता आलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 38.1 ओव्हरमध्ये 147 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंडियाने हे विजयी आव्हान 30 ओव्हरच्या आतच पूर्ण केलं. भारताने 29.4 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 149 धावा केल्या.
टीम इंडियाच्या प्रतिका रावल, स्मृती मंधाना आणि हर्लीन देओल या तिघींनी विजयात प्रमुख भूमिका बजावली. प्रतिका आणि स्मृती या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र 53 धावांवर भारताला पहिला आणि एकमेव झटका लागला. स्मृती 46 बॉलमध्ये 6 फोरसह 43 रन्स करुन आऊट झाली. त्यानंतर प्रतिका रावल आणि हर्लीन देओल या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं.
प्रतिका आणि हर्लीन या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 95 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघींनी चौफेर फटकेबाजी केली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींनी मुंबईला 56 चेंडूंआधीच विजय मिळवून दिला.प्रतिकाने अर्धशतक झळकावलं. मात्र हर्लीनची फिफ्टी करण्याची संधी हुकली. प्रतिकाने 62 बॉलमध्ये 7 फोरसह 80.65 च्या स्ट्राईक रेटसह नॉट आऊट 50 रन्स केल्या. तर हर्लीन देओल हीने 71 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 48 धावांचं योगदान दिलं. तर श्रीलंकेकडून इनोकास रनवीरा हीने एकमेव विकेट घेतली.
टीम इंडियाची विजयी सलामी
दरम्यान त्याआधी हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हरमनप्रीतचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पद्धतशीर गुंडाळलं. गोलंदाजांनी श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा मोठी खेळी करण्याआधीच रोखलं. तसेच अनेकांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून स्नेह राणा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि एन चरणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अरुंधती रेड्डी हीने एक विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.