उरुळी कांचन : उसने पैसे दिलेल्या व्यक्तीबद्दल विचारणा केल्याने टोळक्यांने तीन जणांवर धारदार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्याच्या जवळ असणाऱ्या गुलमोहर लॉन्सच्या समोर सोमवारी (ता. २८) पहाटे एकच्या सुमारास घडली. याबाबत सुरज प्रशांत वाघामारे (वय १६, रा. पत्ता गोपाळपटटी मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शंकर सुनील कदम (वय १७), शाहीद लाजुदिदन शेख (वय १७), सर्वेश संभाजी काळे (वय १७), सर्व रा. गोपाळपट्टी, मांजरी, ता. हवेली) या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रेम (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व इतर पाच जणांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज वाघामारे हे त्यांचे तीन मित्र शंकर कदम, शाहीद शेख आणि सर्वेश काळे यांच्या सोबत कवडीपाट टोलनाका येथील इराणी चहाच्या हॉटेलजवळ सोमवारी (ता. २८) पहाटे एकच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी तेथे थांबलेल्या तीन व्यक्तींना शंकर कदम म्हणाले की, 'प्रेम कुठे आहे? प्रेम कडे माझे पैसे आहेत, मला घ्यायचे आहेत', असे म्हणताच सदर तीन व्यक्तींनी काही वेळातच तेथे आणखी तीन व्यक्तींना बोलावून घेऊन, 'मगाशी प्रेम बद्दल विचारणारा कोण होता रे? असे विचारून शिवीगाळ करुन शंकर कदम यास हॉकी स्टीक व धारदार हत्याराने मारहाण करु लागला.
आरोपी प्रेम याने त्याच्याकडील धारदार हत्याराने शंकर कदम याला डोक्यात धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर सर्वेश व शाहीद यांना पकडून हॉकी स्टीकने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने शाहीद शेख याच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करुन जखमी केले आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.