IPL 2025, RR vs GT: शुभमन गिलचं शतक हुकलं, बटलरचीही बॅट तळपली; गुजरातचे राजस्थानसमोर मोठं लक्ष्य
esakal April 29, 2025 06:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२८ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होत आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातने २१० धावांचे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवले आहे. गुजरातसाठी आज कर्णधार शुबमन गिल आणि जॉस बटलर यांची बॅट तळपली.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. गुजरातकडून साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली.

या दोघांनीही सुरुवातीला विकेट्स जाऊ न देता चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिले १० षटके पूर्ण खेळून काढले. त्यांच्यात ९३ धावांची भागीदारी झाली. पण ११ व्या षटकात सुदर्शनला महिश तिक्षणाने ३० चेंडूत ३९ धावांवर असताना बाद केले.

पण त्यानंतरही गिलला जॉस बटलरने साथ दिली. गिलने त्याचे हंगामातील चौथे अर्धशतक ठोकले. बटलरही आक्रमक खेळत होता. गिल आणि बटलर यांच्यातही ७४ धावांची भागीदारी झाली.

गिलचे शतक होईल, असे वाटत होते. पण त्याला १७ व्या षटकात तिक्षणानेच रियान परागच्या हातून झेलबाद केले. गिलने ५० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतरही बटलरने त्याचा आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. पण दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदर ८ चेंडूत १३ धावांवर आणि राहुल तेवतिया ९ धावांवर बाद झाले.

पण डावाच्या शेवटच्या चेंडूवर बटलरने अर्धशतक पूर्ण केले. बटलरचेही ही यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक आहे. बटलर २६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावांवर नाबाद राहिला. शाहरुख खान २ चेंडूत ५ धावांवर नाबाद राहिला. गुजरातच्या २० षटकात ४ बाद २०९ धावा झाल्या आहेत.

राजस्थानकडून महिश तिक्षणाने २ विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

शुभमन गिलचा दिग्गजांमध्ये समावेश

शुबमन गिलने ८४ धावांची खेळी करताना ४ षटकारही मारले. त्यामुळे आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना त्याने १०० षटकांचा टप्पा पार केला. त्याचे आता सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये ९१ सामन्यांत १०१ षटकार झाले आहेत. त्यामुळे तो १०० षटकार पूर्ण करणारा सहावा भारतीय सलामीवीर ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय सलामीवीर
  • १७४ षटकार - केएल राहुल (१०० सामने)

  • १७१ षटकार - विराट कोहली (१२३ सामने)

  • १४३ षटकार - शिखर धवन (२०२ सामने)

  • १३५ षटकार - रोहित शर्मा (१११ सामने)

  • १०४ षटकार - विरेंद्र सेहवाग (९८ सामने)

  • १०१ षटकार - शुभमन गिल (९१ सामने)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.