पुणे : कोथरूड, बाणेर, बावधन या परिसरातील अनेक रस्त्यांचे भूसंपादन होत नसल्याने रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे किंवा बॉटलनेक होत असल्याने कोंडी होत आहे. यातून सुटका करण्यासाठी सक्तीचे सक्तीच्या भूसंपादन केले जाणार आहे. याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आले आहे अशी माहिती कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बैठकीत देण्यात आली.
कोथरूडचे आमदार व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. २८) कोथरूडच्या प्रश्नावर बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. व एम जे प्रदीप चंद्रन आदी उपस्थित होते. कोथरूडमधील रस्त्यांचे भूसंपादन करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. त्यावेळी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती सादर केली.
हे आहेत अर्धवट रस्ते- यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडून गांधीभवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दीड गुंठा जागा ताब्यात आलेली नाही. तेथे मालक आणि दिव्यांग भाडेकरूसोबत चर्चा करूनही मार्ग निघाला नाही, त्यामुळे सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे.
- कर्वे पुतळा येथील पेट्रोल पंपाच्या बाजूने २० मीटरचा डीपी रस्ता आहे, तो केल्यास थेट मयूर कॉलनीशी हा भाग जोडला जाईल.
- पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपूल ते मयूर कॉलनी डीपी रस्त्यावरील भीमनगर येथील एक स्वच्छतागृहाचा प्रश्न कायम आहे त्यास अंतिम नोटीस लवकरच बजावली जाणार आहे. तसेच ‘बीएसयूपी’च्या पाच घरांबाबतची प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण होईल.
- वारजे येथील डॉ. आंबेडकर चौकापासून तिरूपतीनगरमार्गे डुक्कर खिंडीला जोडणारा रस्ता आहे, यातील जागा बीडीपीतील असून जागा मालकांनी निवासी दराने नुकसान भरपाई मागितली आहे. त्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला आहे.
- पाषाण येथील पीएमपी डेपो ते बाह्यवळण रस्त्याचा सेवा रस्ता व ननावरे बायपास येथील जागा ताब्यात आली आहे, लवकरच रस्ता केला जाईल.
- कस्पटे वस्ती येथील पुलाच्या पोहोच रस्ता, बाणेर पाषाण लिंक ३६ मीटर रस्ता, पाषाण सर्कल येथील ३० मीटर रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे.