ईडीच्या मुंबईतील विभागीय कार्यालयात रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये काही कागदपत्रं आणि फर्निचर जळून खाक झालंय. आगीमुळे ईडीकडे दाखल असलेले गुन्हे आणि खटल्यांच्या तपासावर परिणाम होणार का? याबाबत ईडीने प्रतिक्रिया दिलीय. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बॅलार्ड इस्टेटमधील कैसर ए हिंद इमारतीतील ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती.
आगीबाबत ईडीने सांगितलं की, प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता आहे. यात किती नुकसान झालंय याचा अंदाज घेतला जात आहे. आगीच्या घटनेत काही कागदपत्रं आणि फर्निचर जळालं आहे.
ईडीने सांगितलं की, जी कागदपत्रं जळाली आहेत त्यांचे डिजिटल स्वरुपात पुरावे आहेत. याशिवाय केंद्रीयकृत रेकॉर्ड ठेवण्याच्या व्यवस्थेनुसार सगळं संग्रहित ठेवलं जातं. ज्या प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांचे मूळ रेकॉर्ड न्यायालयांकडे उपलब्ध आहे. यामुळे चौकशीत किंवा तपासात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
कैसर ए हिंद इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कार्यालय सुरू आहे. चौथ्या मजल्यावरील कार्यालयातला भाग हलवण्यात आलाय. आता जुन्या विभागीय कार्यालयातून त्याचं कामकाज सुरू आहे. आगीची माहिती कार्यालयातील कर्मचारी आणि सुरक्षा गार्ड्सनी पाहिली होती असंही ईडीने सांगितलं.
पोलिसांनी अडीच वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. यानंतर ५० पेक्षा जास्त अधिक कर्मचारी आणि अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. साडे तीन वाजता अग्निशमन दलाने काम सुरू केलं. ईडीने सांगितलं की, मुंबईत वेगळं कार्यालय उभारण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये ईडीसाठी बीकेसीमध्ये जमीन दिली आहे. लवकरच स्वतंत्र कार्यालय उभारल्यानंतर सर्व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातील.
फडणवीस काय म्हणाले?ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीवरून राजकारण पेटलंय. विरोधकांनी या आगीवर शंका व्यक्त केलीय. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ईडी कार्यालयाला आग लागली असली तरी तिथली कागदपत्रं सुरक्षित आहेत. ईडीच्या कार्यालयातील कागदपत्रांचं मिरर इमेजिंग स्टोरेजही आहे. त्या आगीमुळे कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही.