विपर्यासाचा 'इतिहास'
esakal April 29, 2025 09:45 AM
अग्रलेख

‘‘इतिहासकार हा सत्याशी प्रामाणिक, निःपक्षपाती, निर्भीड, भावनांच्या आहारी न जाणारा, हितसंबंधांमुळे येणाऱ्या पूर्वग्रहांपासून मुक्त असला पाहिजे...’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एके ठिकाणी व्यक्त केलेली ही अपेक्षा म्हणजे इतिहासलेखनाची भूमिका किती जबाबदारीने निभवावी लागते, याचे नेमके वर्णन आहे. त्याची आठवण करून देण्याचे कारण म्हणजे राजकीय कारणांसाठी, फायद्यासाठी इतिहासाचा विपर्यास करण्याचे वाढत चाललेले प्रकार. समाजमाध्यमांसारखी साधने हाताशी आल्यानंतर जो काही माहितीवहनाचा महापूर वाहत आहे, त्यात ‘इतिहासा’च्या नावाखाली जे काही सांगितले जाते, ते अनेकदा निव्वळ दिशाभूल करणारे असते. पूर्वग्रहांचे, हितसंबंधांचे, राजकीय आवडीनिवडींचे अक्षरशः थैमान त्यात आढळते. त्यामुळेच अलीकडच्या काळात ‘नॅरेटिव्ह’ हा शब्द जास्त प्रचलीत झाला आहे.

या कथनक्लृप्तींमागे अर्थातच सत्याचा शोध ही प्रेरणाच नसते. भूतकाळातील घटना सोडा; अगदी ताज्या घटना-घडामोडींनाही आपापल्या परीने वळण देण्याचा प्रयत्न होतो. हा एक स्वतंत्र प्रश्न आहे. परंतु अशा समस्या जर शिक्षणाच्या क्षेत्रात शिरकाव करू लागल्या तर त्यांचे गांभीर्य खूपच वाढते. विद्यार्थ्यांसमोर अभ्यासासाठी म्हणून जो इतिहास सांगितला जातो, त्यात विपर्यासाची लागण होत नाही ना, यावर डोळ्यात तेल घालून जाणकारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जे प्रयोग होताहेत, ते याचे ताजे उदाहरण. बदलणाऱ्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवीच्या समाजविज्ञानाच्या पुस्तकात मुघल साम्राज्याचे, वेगवेगळ्या राजवटींचे उल्लेख वगळण्यात आले आहेत. या राजवटींना अवाजवी स्थान देऊन त्यांचे प्रस्थ वाढवले असेल तर ते कमी करणे योग्य.

पण त्यांचा उल्लेखच वगळणे कितपत सयुक्तिक ठरेल, हा विचार केला पाहिजे. लंबक एकीकडे झुकला म्हणून तो जागेवर आणण्याऐवजी दुसऱ्या दिशेने खेचणे हेही योग्य नाही. नव्या बदलांमधील आणखी एक भाग म्हणजे ‘पवित्र भूगोल’ नावाची संकल्पना. ती पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात येत असून ‘चारधाम’सह देशातील सर्व धर्मीयांना पवित्र मानल्या जाणाऱ्या देशाच्या विविध भागांतील स्थळांची माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय महाकुंभासारखे धार्मिक सोहळे, तसेच बेटी बचाओ.. सारख्या सरकारी योजनांच्या माहितीचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. या सर्वच बदलांची, त्यातील आशयाची काटेकोर समीक्षा व्हायला हवी. जाती-वर्ण व्यवस्थेने एकेकाळी समाजाला स्थिरता प्रदान केली, परंतु परक्या राजवटींच्या; विशेषतः ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात त्या व्यवस्थेला विकृत स्वरूप प्राप्त झाले, या आशयाचा बदललेल्या अभ्यासक्रमातील उल्लेख विवाद्य ठरू शकेल.

खरे तर प्रबोधनाच्या काळात आपल्याकडच्या समाजसुधारकांनी या व्यवस्थेची एवढी प्रखर चिकित्सा केली आहे, की त्याविषयी अभ्यासक्रम आखणाऱ्यांनी एवढे हळवे होण्याचे कारण काय, असा प्रश्न पडतो. एकूणच यातील काही गोष्टी तरी ‘शिक्षणाचे भगवेकरण’ या टीकेला वाव देणाऱ्या आहेत. ती करणाऱ्यांमध्ये काही कॉँग्रेसजनांबरोबरच डावे अभ्यासक, विचारवंत, इतिहासकार वगैरे पुढे असतात आणि पुढेही असतील. पण इतिहासाच्या विपर्यासाच्या बाबतीत त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखविताना थोडे आत्मपरीक्षण करावे. ‘एनसीईआरटी’च्या याच सातवीच्या आधीच्या पुस्तकाचे उदाहरण घ्या.

त्यात मुघल सल्तनतींची माहिती सविस्तर आहे. त्यापैकी अनेकांना सुप्रशासक म्हणून प्रशस्तिपत्रक बहाल केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला केवळ तीन ते चार वाक्ये. केवढ्या प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देऊन या राजाने स्वराज्य आणि सुराज्याचा मानदंड उभा केला, त्यामागचे स्वातंत्र्यभावनेचे स्फुल्लिंग, राष्ट्रीय दृष्टिकोन यापैकी काही विद्यार्थ्याच्या अंतःकरणाला स्पर्शणारही नाही, अशी ही सगळी पाठ्यपुस्तकाची रचना होती.

इतर इयत्तांच्या इतिहासातही महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, क्रांतिकारक यांना स्थान देताना हात आखडता घेतला गेला. अनेक ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेखही नाही. २००८मध्ये अर्जुनसिंह मनुष्यबळ विकास मंत्री असताना तयार करण्यात आलेल्या या असल्या पुस्तकांच्या विरोधात आवाज उठायला हवा होता. काही अपवादात्मक प्रयत्न वगळता याहीबाबतीत (एकविसाव्या शतकात) ‘महाराष्ट्र थंड गोळा होऊन पडला होता’, असे म्हणावे लागेल. इतिहासाच्या किंवा समाजविज्ञानाच्या पुस्तकांच्या बाबतीत निखळ शैक्षणिक दृष्टिकोनाची नितांत गरज आहे.

डॉ. आंबेडकर यांनी इतिहासकारांसाठी सांगितलेली पथ्ये याबाबतीत मार्गदर्शक ठरू शकतील. पाठ्यपुस्तक तयार करताना ती पूर्णांशाने पाळता येतील आणि आदर्श स्थिती याबाबतीत गाठता येईल, असे नाही, तशी अपेक्षाही ठेवता येणार नाही. पण प्रयत्नांची दिशा ती हवी. अन्यथा इतिहास ‘यांच्या’ किंवा ‘त्यांच्या’ तावडीत अडकत राहील. आपल्या शालेय विद्यार्थ्यांपुढे सत्य काय आहे ते मांडा. त्यांच्यापुढे ‘इतिहास’ ठेवा, ‘नॅरेटिव्ह’ नको.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.