मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’'' पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, ‘‘पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिचे कायद्याचे शिक्षण पूर्ण होत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्यावी.’’