नाशिक- नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे राज्यातील पहिल्या रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात परतीच्या स्थलांतरित मार्गावर पक्ष्यांचे सर्वेक्षण झाले. चाळीस पक्षीमित्रांनी सहभाग घेतलेल्या सर्वेक्षणात ‘चायनीज पाँड हेरॉन’ या पक्ष्याचे राज्यात प्रथमच दर्शन झाले.
साधारणपणे ४७ सेमी (१९ इंच) लांबीच्या पक्षाचे पंख पांढरे असतात, टोक काळे असते, डोळे आणि पाय पिवळे असतात. चीन आणि लगतच्या समशितोष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय पूर्व आशियातील उथळ गोड्या आणि खाऱ्या पाणथळात आढळतो. बंगाल मधील वादळी पावसामुळे भरकटल्याची शक्यता पक्षीमित्रांनी व्यक्त केली आहे.
नाशिक मधील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात रविवारी सकाळी पक्षी अभयारण्यात सात ते दहापर्यंत झालेल्या सर्व्हेक्षणात दहा हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली. सहायक वन संरक्षक हेमंत उबाळे यांनी सांगितले कि, पक्षी अभयारण्यात दोन महिन्यापासून सुरु असलेल्या विकासकामांमुळे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी टायफा आणि पानवेली काढण्याचे काम केल्याने पक्ष्यांना मुबलक खाद्य उपलब्ध झाले पक्ष्यांची संख्या वाढली. पानवेली पासून खत करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी कार्यशाळा झाली.
हिवाळ्यातील सर्व्हेक्षणातही आशियातून भारतात स्थलांतर करणाऱ्या ब्ल्यू थ्रोट हा अभयारण्यात विन केल्याचे बघावयास मिळाले. ग्रेटर पेंटेड स्नाईप,ट्री पीपीट,एलो बिटर्न,या पक्ष्यांसह ग्रे हेरॉन,पेंटेड स्टोर्क,किंगफिशर,रोझी स्टारलिंग,आदी पक्षी देखील बघावयास मिळत असून जाकाना,पर्पल मूरहेन आणि कूट या पक्ष्यांची पिले पावसाळ्यापूर्वी बघावयास मिळाली.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, थायलंड मधून आलेल्या पो मॅम, प्रभारी वनपाल संदीप काळे, वनरक्षक आशा वानखेडे, डॉ.अनिल माळी, दर्शन घुगे, रवींद्र वामनाचार्य, डॉ.जयंत फुलकर, नीतेश पिंगळे, भीमराव राजोळे, अमोल दराडे, अमोल डोंगरे, नितेश पिंगळे, शंकर लोखंडे, गंगाधर आघाव, विकास गारे, प्रमोद दराडे, रोहित मोगल, किरण बेलेकर, गणेश वाघ, केशव नाईकवाडे, मंजूषा पत्की, मिलिंद पत्की, अनंत सरोदे, उमेशकुमार नगरे, कीर्ती मारू, मनोज वाघमारे, नूरी मर्चंट, नितीन कोकणे, संदीप सोनवणे, राजू ठाकरे, ओमकार भावनाथ, नेहा कडलग, सुनील जाधव, प्रमोद मोगल आदींसह पक्षिमित्र,गाईड सहभागी झाले होते.
सर्वेमध्ये महाराष्ट्रात प्रथमच चायनीज पाँड हेरॉन पाहावयास मिळाला. हा पक्षी भारतात खूपच कमी पाहिला गेला आहे. वन विभागाने दर महिन्याला पक्षी गणना केल्यास अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा मार्गही समजण्यास मदत होईल.
- प्रा. आनंद बोरा, अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक