rat29p2.jpg
60625
रत्नागिरी - आरे-वारे समुद्रकिनारा.
समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधांसाठी ४ कोटी
पर्यटन विकास योजना; भाट्ये, आरे-वारे, आंबोळगड, कशेळीचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : भाट्ये, आरे-वारे, आंबोळगड, कशेळी या समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे चार कोटीचा निधी उपलब्ध झाला असून, ती कामे प्रगतीपथावर आहेत. गोवा, केरळच्या धर्तीवर रत्नागिरीत समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटनकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्याला अथांग समुद्रकिनारे लाभले असले तरीही त्यांचा वर्षांनुवर्षे अपेक्षित विकास झालेला नाही. किनाऱ्यांची स्वच्छता व्हावी यासाठी काही कंपन्यांनी किनारे दत्तक घेऊन त्याची स्वच्छता केली जाते; परंतु कंपन्यांकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अथांग किनारे असले तरीही त्या तुलनेत पर्यटक येत नाहीत. किनाऱ्यावर जाण्यासाठी जोडरस्ते, स्वच्छतागृह, वाहने उभी करण्यासाठी जागा, माहिती फलक आदी सुविधा नाहीत.
पर्यटनवाढीसाठी किनाऱ्यावर पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे पायाभूत सुविधांतर्गत कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी चार कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये भाट्येकिनारी जोडरस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे उभारली जातील. आरे-वारे आणि आंबोळगड, कशेळी, अणसुरे (ता. राजापूर) या किनाऱ्यावरही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. प्रत्येकी सुमारे एक कोटीची ही कामे आहेत. ती आता प्रगतीपथावर असून, पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीतील किनारी पर्यटनात मोठी वाढ होणार आहे.