पळसदरी-ठाकूरवाडीतील विहिरीचे पाणी दूषित
esakal April 30, 2025 04:45 AM

कर्जत, ता. २९ (बातमीदार) ः तालुक्यात ३० ग्रामपंचायतींमध्ये जल जीवन मिशनची कामे कूर्मगतीने सुरू आहेत. योजनेच्या अंमलबजावणीतील हलगर्जीमुळे पळसदरी- ठाकूरवाडीतील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावातील एकमेव जुनी विहीर असून जल जीवन योजनेत वापरण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने चाचपणीसाठी त्यात दूषित पाणी सोडले आणि त्यामुळे विहिरीतील पाण्याची गुणवत्ता घसरली. गढूळ पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी विहिरीभोवती गर्दी करीत संताप व्यक्त केला.
पळसदरी- ठाकूरवाडीमध्ये सुमारे १४० घरांची वस्ती असून ६०० हून अधिक लोकसंख्येची तहान या विहिरीवर भागते. सरकारकडून मंजूर झालेली एक कोटी ८४ लाखांची जल जीवन योजना गावासाठी नवीन पाण्याचा स्रोत तयार करण्यासाठी होती; मात्र ठेकेदाराने जुन्या विहिरींचा वापर करून संपूर्ण योजनेची दिशा बदलली. त्यामुळे सरकारी निधीचा गैरवापराबरोबरच आरोग्याशीही खेळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत केला. गावातील पोलिस पाटील विनया खोपकर यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; मात्र संतप्त ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी एकत्र येत विहिरीभोवती घेराव घालून निषेध व्यक्त केला; तसेच तत्काळ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

सरकारी निधीचा अपव्यय
पळसदरी- ठाकूरवाडी येथे जल जीवन योजनेच्या कामादरम्यान ठेकेदाराने जलवाहिनीच्या तपासणीसाठी विहिरीत दूषित पाणी सोडले, यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जल जीवन योजनेसाठी गावात नवी विहीर मंजूर करण्यात आली असताना ठेकेदाराने मनमानी करीत जुन्या विहिरीचा योजनेत जलस्रोतासाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारी निधीचा अपव्यय झाला असून जुन्या विहिरीतील पाणीही दूषित झाले आहे.

कारवाईची मागणी
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घसरल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असून गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकाराला विरोध करीत ग्रामस्थांनी विहिरीभोवती घेराव घालून ठेकेदाराच्या कारभाराचा निषेध केला आणि प्रशासनाकडून तत्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.