परीक्षा देण्यासाठी दिल्लीला गेलेल्या एमबीबीएस डॉक्टर तरुणी हरियाणात जळालेल्या अवस्थेत आढळली होती. उपचारावेळी तिचा मृत्यू झाला होता. भावना यादव असं मृत्यू झालेल्या डॉ़क्टर तरुणीचं नाव आहे. ती दिल्लीत ऑनलाइन क्लास करत असे आणि परीक्षा देण्यासाठी नेहमी दिल्लीला जात असे. २१ एप्रिलला ती दिल्लीला गेली होती. त्यानंतर २४ एप्रिलला एका तरुणाने फोन करून भावना आगीत होरपळल्याचं आणि हिसारमध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं. यानंतर तरुणाचा फोन बंद झाला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी जयपूरमध्ये गुन्हा दाखल केला असून हिसार पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आलाय. हिसार पोलिसांनी भावनाला रुग्णालयात दाखल करणाऱ्या तरुणाच्या राहत्या घरी चौकशी केलीय. तो एका विद्यापीठात क्लार्कची नोकरी करत असून त्याच्या घरी पेट्रोलची बाटली आणि इतर काही पुरावे आढळले आहेत. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. भावनाने PG करण्यासाठी 10 ते १२ लाखांच्या पॅकेजची ऑफर नाकारली होती. त्यानंतर ती परीक्षा देत होती.
तरुणाने जेव्हा भावनाच्या घरच्यांना फोन करून ती रुग्णालयात असल्याचं सांगितलं तेव्हा कुटुंबिय तातडीनं तिथं पोहोचले. त्यावेळी तिच्यासोबत दुसरं कुणीही नव्हतं. पुढील उपचारासाठी भावनाला दुसऱ्या रुग्णालयात नेलं पण उपचारावेळीच तिचा मृत्यू झाला. भावनाला रुग्णालयात दाखल करणाऱ्या तरुणाचं नाव उदेश यादव असं असल्याचं सांगण्यात येतंय. तो भावनाच्या एका चुलत बहिणीचा दीर आहे. उदेश विवाहित असून त्यानं असं का केलं याचा तपास आता पोलीस करत आहेत.
भावनाच्या आईने पोलिसांना सांगितलं की, मी मुलीच्या पोटावर मोठे जखमांचे व्रण पाहिले. तिच्यावर धारदाऱ शस्त्राने वार केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी आईचा जबाब नोंदवून या घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी भावनाचा फोन ताब्यात घेतलाय. तर तिच्या मित्रांची चौकशी केली जात आहे. भावनावर हल्ला झाल्याची शक्यता आहे. तसंच तिला रुग्णालयात दाखल करणाऱ्या तरुणाच्या खोलीत पेट्रोल आणि इतर काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यात. या प्रकरणी आता तीन पथकं तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.