साखरपा -करंजारी ते आंबा घाट चौपदरकरणाची पाहणी
esakal April 29, 2025 11:45 PM

करंजारी ते आंबाघाट चौपदरीकरणाची
आमदार किरण सामंतांकडून पाहणी
नागरिकांना मोबदला त्वरीत देण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २९ः मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामाची पाहणी करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांच्यासह संयुक्त दौरा केला. करंजारी ते आंबाघाटापर्यंतच्या कामाची पाहणी करून काही सुधारणाही त्यांनी सुचवल्या आहेत.
आंबाघाटातील कामाची पाहणी करताना प्रांताधिकारी जीवन देसाई, महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न व समस्या यावर उपाययोजना लवकरात होण्यासाठी आणि पावसाळ्यात कोणत्याही दुर्घटना घडू नयेत म्हणून त्यांनी सूचना केल्या. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाययोजना कराव्यात, असेही आमदार सामंत यांनी सांगितले आहे. तसेच ज्या नागरिकांना अजून मोबदला मिळाला नाही अशा नागरिकांना लवकरात लवकर मोबदला मिळाला पाहिजे, अशाही सूचना अधिकाऱ्यांना आमदारांनी दिल्या आहेत.
करंजारी, देवळे, दाभोळे, तिवरे, मेढे, कोंडगाव, साखरपा, दख्खन आदी भागातील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या वेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार सामंत यांच्या या दौऱ्याला लवकरच चालना मिळणार आहे व नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.