पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह लष्कराचे तिन्ही प्रमुख उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील ही बैठक सुरक्षा प्रकरणी मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीच्या एक दिवस आधी होत आहे.
गेल्या आठवड्यात पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती आणि सुरक्षेच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीत दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलांची कारवाई आणि पुढच्या रणनितीवर चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर आधीपासूनच कठोर भूमिका घेतलीय. दोषींवर कठोर कारवाईचे आदेश याआधीच देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होत असेलल्या बैठकीआधी मंगळवारी दिल्लीत गृहमंत्रालायत उच्च स्तरिय बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव, बीएसएफ, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालकही उपस्थित होते. यात सीआरपीएफ, एसएसबी, सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारीही होते. बुधवारी होणाऱ्या सीसीएसच्या बैठकीआधी या सर्व बैठका होत आहेत. बुधवारी सीसीपीएची बैठकही होणार आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. ५० ठिकाणं पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. पुरेशी सुरक्षा नसल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलंय. या ठिकाणांमध्ये वेरीनाग, बंगस खोरं, युसमार्ग रिसॉर्ट यांचा समावेश आहे. जिथं सुरक्षा कडेकोट आहे ती पर्यटन स्थळं सुरू राहतील असं सरकारकडून सांगण्यात आलंय.