IPL 2025 : माजी कर्णधार दुखापतीमुळे स्पर्धेतून ‘आऊट’, प्लेऑफआधी संघाला तगडा झटका
GH News April 30, 2025 11:07 PM

आयपीएल 2025 स्पर्धा रंगतदार स्थितीत पोहचली आहे. प्लेऑफमधील 4 स्थानांसाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. काही संघाचे 10 आणि त्यापेक्षा अधिक पॉइंट्स आहेत. त्यामुळे अव्वल 6-7 संघांमध्ये प्लेऑफसाठी रस्सीखेच आहे. प्लेऑफमुळे आता एक एक सामना निर्णायक ठरत आहे. अशात आता क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी ऑलराउंडर आणि माजी कर्णधाराला दुखापतीमुळे आयपीएलच्या या 18 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पंजाब किंग्सचा अनुभवी ऑलराउंडर आणि माजी कर्णधार ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. मॅक्सेवलला बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे उर्वरित सामन्यांना मुकावं लागणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी टॉस दरम्यान याबाबतची माहिती दिली आहे. चेन्नई विरुद्ध पंजाब यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे.

ग्लेन मॅक्सवेल याला नेतृत्वासह, बॅटिंग आणि बॉलिंगचा अनुभव आहे. मॅक्सवेलची या मोसमात बॅट चालली नाही. मात्र त्याने अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. मात्र आता निर्णायक वेळेस मॅक्सवेल नसल्याने त्याची उणीव पंजाबला निश्चितच भासणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलची निराशाजनक कामगिरी

ग्लेन मॅक्सवेल याला या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी अशी खेळी करताच आली नाही. मॅक्सवेलने आयपीएल 2025 मध्ये एकूण 7 सामने खेळले. मॅक्सवेलने या 7 सामन्यांमध्ये एकूण 49 चेंडूत 97.96 च्या स्ट्राईक रेट आणि 8.00 या एव्हरेजने एकूण 48 धावा केल्या. मॅक्सवेलची 30 ही या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच मॅक्सवेलने 13 ओव्हर बॉलिंग टाकून 4 विकेट्सही मिळवल्या.

मॅक्सवेलऐवजी कुणाला संधी?

आता मॅक्सवेल बाहेर झाल्याने त्याच्या जागी बदली खेळाडू कोण असणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. कर्णधार श्रेयसने टॉस दरम्यान मॅक्सवेलच्या जागी अजून बदली खेळाडू म्हणून कुणाला संधी द्यायची? याबाबतचा निर्णय झाला नसल्याचं सांगितलं.

मॅक्सवेल IPL 2025 मधून बाहेर

पंजाबची कामगिरी

दरम्यान पंजाब किंग्सने या हंगामात आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. पंजाबने 9 पैकी 5 सामना जिंकले आहेत. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाब ताज्या आकडेवारीनुसार 11 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.