विद्यार्थी म्हणून अभ्यास, सामाजिक आयुष्य आणि आर्थिक गणितं सांभाळणं हे खूपच आव्हानात्मक असतं; पण याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला स्टाईलवर तडजोड करावी लागेल. तुम्ही स्टायलिश आणि वापरण्याजोगा वॉर्डरोब स्वस्तातही करू शकता. मी कॉलेजला जाण्याआधी सगळ्या मुलींप्रमाणे माझीही स्वप्नं रंगवून झाली होती.
मुळात कॉलेजमध्ये युनिफॉर्म नसणार याचं मला प्रचंड कौतुक वाटत होतं. आता वेगवेगळे आणि मनासारखे कपडे घालायला मिळणार याचा आनंद वाटायचा. अगदी मोजकेच कपडे असले, तरीसुद्धा यामध्येच आपण सुंदर दिसायचं याबाबतीत मनाची तयारी असायची. खरंतर स्टाईल किंवा फॅशन याचा गंधही नव्हता.
मला आठवतंय खरं तर त्यावेळी पार्लरमध्ये जाण्याएवढा श्रीमंत पॉकेटमनी नव्हता. मग अशा वेळेला पैसे कमावण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढायचे. डान्स क्लासेस घेणं, कुठल्यातरी इव्हेंटला वॉलेंटियर म्हणून ड्युटी करणं, मंडळांमध्ये विविध नाटकांत आणि नृत्यांत भाग घेऊन बक्षीस मिळवणं असं करायचे.
त्यावेळी मात्र कुठल्याही मासिकात किंवा वृत्तपत्रात फॅशन किंवा त्वचेची काळजी याबाबतीत टिप्स मिळाल्या, की त्या मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे. या गोष्टींचा मला प्रचंड फायदा व्हायचा. घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबतीतल्या टिप्स वाचून स्वतः तशी चेहऱ्याची काळजी घ्यायचे.
त्या वेळच्या या उद्योगांचा आज मला माझ्या युट्युब चॅनेलसाठी प्रचंड फायदा झालेला आहे. टॅन काढण्यासाठी पार्लरमध्ये पळावं लागत नाही, त्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या गोष्टींमधून आपण चेहरा उजळ करू शकतो याबाबतीत मी अजूनही तेवढीच ठाम आहे.
तसंच अगदी फॅशन आणि स्टाईलचा बारकाईनं अभ्यास आणि विचार केला, तर आपण कमी पैशांमध्ये स्टायलिश वॉर्डरोब तयार करू शकतो. केवळ ब्रँडेड कपडेच तुम्हाला क्लासी दिसू शकतात असं नाही. खरंतर आपल्या आवडीनिवडीनुसार आणि कम्फर्टनुसार बेसिक कपड्यांना प्राधान्य देणं गरजेचं असतं.
सोयीच्या आणि आवडणाऱ्या कपड्यांमध्ये न्यूट्रल रंगांचं कलेक्शन हे असायलाच हवं. आपल्याला परवडणारे कपडे हे ऑनलाइन जास्त प्रमाणात बघायला मिळतात. शिवाय सीझनल सेलची माहिती ठेवल्यास ब्रँडेड कपडे कमी दरात विकत घेऊ शकतो.
साधे वाटणारे कपडे एम्ब्रॉयडरी किंवा फॅब्रिक पेंट, निरनिराळे पॅचेस वापरून छानपणे सजवू शकतो. यामुळे खर्च वाचतो आणि वेगळं स्टाईल स्टेटमेंट तयार होतं. या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार केल्यास कमी बजेटमध्ये आपण स्टायलिश दिसू शकतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
१) रिच लूकसाठी न्यूट्रल कलर वापरावेत. स्किन टोनप्रमाणे रंगसंगतीची निवड करावी.
२) ठरावीक पद्धतीची ज्वेलरी कलेक्शन ठेवलीत तर आऊटफिट वेगवेगळे दिसतात. निरनिराळ्या प्रकारचे जॅकेट्स किंवा लेअरिंग केल्यानं आऊटफिट खूप छान दिसतात.
४) स्थानिक फॅशन स्ट्रीटमध्ये उत्तम गोष्टी मिळू शकतात. सृजनशीलतेनं स्टायलिश, ट्रेंडी दिसता येतं.
५) ऑनलाईन सेल्सचा पुरेपूर वापर करू शकता. त्यासाठी तुमच्या बॉडी मेजरमेंटबाबतीत माहिती करून घ्यावी.
६) कपड्यांची अदलाबदल करावी. जे कपडे तुम्ही वापरत नसाल ते कुणा दुसऱ्यासाठी नवीन स्टाईल होऊ शकते.
७) पैसे वाचवण्यासाठी मिनिमल वॉर्डरोब या कल्पनेचा विचार करावा.