ढिंग टांग : 'सागर' ते 'वर्षा'..!
esakal May 01, 2025 11:45 AM

प्रिय मित्रवर्य कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांसी शतप्रतिशत प्रणाम.

सर्वप्रथम अक्षय्य तृतीयेच्या सर्वाना अनेकानेक शुभेच्छा. पत्र लिहिण्यास कारण की, आज रोजी आम्ही सहकुटुंब सहपरिवार ‘सागर’ बंगल्यावरुन ‘वर्षा’वर शिफ्ट झालो. गृहप्रवेश झाला. (सोबत पाव किलो पेढ्यांचा पुडा पाठवत आहे. मलई पेढा आहे, दोन दिवसात संपवावा.) शिफ्टिंगचे काम व्यवस्थित झाले.

अजून सामान लागायचे आहे, हळूहळू लावू!! सकाळी टेम्पो भरला, आणि नव्या कपाटावर बसून आलो. कपाटात महत्त्वाच्या फायली होत्या. ‘सागर’ ते ‘वर्षा’ हे काही फार अंतर नाही, पण टेम्पोवाला आगाऊ निघाला. प्रवास जिकिरीचा झाला.

‘वर्षा’ बंगल्यात आल्यावर आधी पुढील हिरवळीवर अनवाणी चालून बघितले. काहीही टोचले नाही!! जिवाला बरे वाटले. खरे सांगू का, ‘मी पुन्हा येईन’ हे वचन आज खऱ्या अर्थाने खरे ठरले असे वाटते आहे. अक्षय्य तृतीयेला जे शुभकार्य कराल, ते परमनंट राहाते, असे म्हणतात.

काही लोक सोनेबिने विकत घेतात, म्हणजे वर्षभर सोने मिळत राहाते म्हणे! अंधश्रद्धा हो, बाकी काही नाही. पण साडेतीन मुहूर्तांपैकी असल्यामुळेच अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश केला. जोडीने पूजा केली, घरगुतीच मामला ठेवला होता, त्यामुळे कोणाला निमंत्रण दिले नव्हते. कृपया गैरसमज नसावा!!

अक्षय्य तृतीयेला आम्ही शिफ्ट झालो म्हणजे आता मी या खुर्चीत अक्षय्य राहणार, असे आमच्या पक्षातील अनेकांना वाटू लागले आहे. आमच्या बावनकुळेसाहेबांनी तर मला २०३४ पर्यंत ‘आहे त्या जागी देवासारखे बसले राहा’ असा आदेश दिला आहे. दहाएक वर्षे ठीक आहे; पण अक्षय्य इथेच राहायचे म्हणजे अवघड आहे. असो.

या कधी तरी चहा प्यायला!! कळावे. आपला. नानासाहेब फ.

ता. क. : आदरणीय दादासाहेब बारामतीकरांनाही वेगळे पत्र (आणि केशर पेढ्यांचा पुडा) पाठवत आहे.

आदरणीय नानासाहेब, सप्रेम जय महाराष्ट्र! सर्वप्रथम तुमचे नव्या गृहप्रवेशाबद्दल अभिनंदन. पेढ्यांचा पुडा मिळाला, पण त्यात मलई पेढे नाहीत, केशर पेढे आहेत! बहुधा दादासाहेब बारामतीकरांना मलई पेढा गेला!! असो. ‘महाराष्ट्र दिना’ला ‘वर्षा’वर कलशपूजन करायला हवे होते, असे वाटले. पण हरकत नाही. अक्षय्य तृतीया हा चांगला मुहूर्त आहे. फोटो बघितले. बरे वाटले. पाच डिसेंबरला तुम्ही शपथ घेतलीत (तारीख माझ्या कायम लक्षात आहे…)

त्यानंतर पाच महिने गेले! पाच महिने लेट का केलात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणारा गृहस्थ पाच महिने झाले तरी राहायला का येत नाही? याला उत्तर काय देणार? तुम्ही २०३४ पर्यंत तिथे रहा किंवा अक्षय्य राहा, माझ्या (हात जोडून) शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.

पण दादासाहेबांचे काय? त्यांना हा गृहप्रवेश कितपत आवडेल मला शंकाच आहे. त्यांचे गाडे अडले आहे…

अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश केला की परमनंट राहता येते, ही अंधश्रध्दा आहे. आपल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही आहे, याची नोंद घ्यावी. मी ‘वर्षा’ बंगल्यावर अडीच वर्षे राहिलो आहे.

तितकासा हवेशीर नाही, पण हिरवळ चांगली आहे!! पहिल्यांदा गेलो तेव्हा मीसुद्धा तिथल्या हिरवळीवर (अनवाणी) चालून बघितले होते, त्याची आठवण आली. पुन्हा शुभेच्छा. बोलावले असते तर काहीतरी फोटोफ्रेम, फुलदाणी वगैरे भेटवस्तू घेऊन आलो असतो. पण असू दे. मीसुद्धा तिथे पुन्हा (केव्हातरी चहाला) येईन! चहाला येईन! चहाला येईन!!

सदैव आपला. कर्मवीर भाईसाहेब. (मु. पो. ठाणे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.