गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आजपासून
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई, ता. ३० ः संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा, संस्कृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत १ ते ४ मेदरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिलेल्या महानुभवांच्या कार्याचा सन्मान या महोत्सवात केला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्राची परपंरा व संस्कृतीची माहिती देणारे पाच दालने उभारण्यात येणार आहे. राज्यभरातून नद्यांचे पवित्र जलकलश आणि ऐतिहासिक ठिकाणावरील मातीचे कलश घेऊनप्रादेशिक विभागातून सहा महाराष्ट्र गौरव कलश रथ १ मे रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच सांयकाळी ६ वाजता वरळीच्या जांबोरी मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.