सोलापूर : पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याविरोधात सोलापुरातील सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेत हुतात्मा चौकात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाळण्यात आला. हल्ल्यातील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
हुतात्मा चौकात केलेल्या या निदर्शनावेळी ‘एक है तो सेफ है’, ‘ते धर्म विचारून मारतात तर तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करा’ असे बॅनर युवकांच्या हातात झळकले. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भारत सरकारने हल्ल्याचे उत्तर चोख द्यावे. पश्चिम बंगाल मध्ये हजारो हिंदूंची हत्या होत आहे, तेथे कडक शासन करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान विषयी लिहिलेले पुस्तक सर्वांनी वाचावे. योग्य ती कारवाई व्हावी, अन्यथा सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही, असा इशारा सुधीर बहिरवाडे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, प्रवीण सरवदे, विशाल पवार, ओंकार चव्हाण, सुनील विटकर, क्षितिजा क्षीरसागर आदी उपस्थित होते.