Latest Marathi News Updates: सोलापूर तालुक्यात बोरामणी गावात विहीर कोसळल्याची दुर्दैवी घटना, दोन मुले ढिगाऱ्याखाली
esakal May 01, 2025 09:45 PM
Live : सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहीर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून, दोन मुले ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

सुमारे ५ ते ६ मुले शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेली असताना अचानक विहिरीच्या दगडी संरचनेचा भाग कोसळला आणि सर्व मुले विहिरीत अडकली.

ग्रामस्थांनी वेळीच माहिती मिळवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघा मुलांना सुखरूप बाहेर काढले.

मात्र, दोन मुले अजूनही विहिरीत अडकले असून, अग्निशमन दल व पोलिस यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे.

घटनास्थळावर हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरुच आहेत.

Live : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आढावा बैठक पार पडली.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

या बैठकीस विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुंभमेळ्याची सर्व कामं वेळेत आणि नियोजनबद्ध रीतीने पूर्ण व्हावीत, यासाठी गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

Live : नाशिक RTO सिग्नलजवळ भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू, पाच जण जखमी

नाशिकमधील दिंडोरी रोडवरील RTO सिग्नलजवळ एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव पिकअप वाहनाने दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत 23 वर्षीय जयश्री सोनवणे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Shirur Live: शिरुरच्या शेतशिवारात रानगव्याचे दर्शन

शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या दहशतीनं ग्रामस्थ हैराण झाले होते, आणि आता दोन रानगवे शेतात घुसल्याने पुन्हा गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या रानगव्यांनी पिकांचं मोठं नुकसान केल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Amaravati Live: भारतात बाबरी मशीद बांधण्याचं स्वप्न पाहू नये- नवनीत राणा

- माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अमरावती येथे बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

- त्यांनी म्हटलं की, "असिर मुनीना माझं स्पष्ट सांगणं आहे; भारतात बाबरी मशीद पुन्हा उभारण्याचा विचारसुद्धा करू नये. इथे बाबरी मशीद कधीच नव्हती आणि भविष्यातही होणार नाही. तिथं राम मंदिर होतं, आहे आणि पुढेही राहील. बाबरी मशीदीची एकही विट पाकिस्तानातून आणून इथे ठेवण्याचं स्वप्न पाकिस्तानने पाहू नये. ते स्वप्नच राहील."

- तसंच, त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं, "भारतालाही बॉम्ब आहेत हे पाकिस्तान विसरू नये. जर भारताविरोधात काही केलं, तर पाकिस्तानचं नाव आणि अस्तित्वही उरणार नाही."

Beed Live: गेवराईत गुंडगिरी; डॉक्टर दाम्पत्याला मारहाण

गेवराईमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याला मारहाण

Jharkhand Live : झारखंड एटीएसने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अममार याशरला केली अटक

झारखंड एटीएसने रांचीमध्ये इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अम्मार याशर याला अटक केली आहे. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की तो पूर्वी आयएमसाठी काम करत होता. २०१४ मध्ये जोधपूर पोलिसांनी अम्मारला अटक केली होती.

Chhattisgadh Live : एनएसएस कॅम्पमध्ये १५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले, विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिरादरम्यान काही विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याबद्दल गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली.

Kashmir Live: काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प

काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. सध्या गर्दी नसल्याने सफरचंद बागांचे मालक आर्थिक नुकसान होत आहे.

Beed Live: बीडमध्ये पाणी टंचाई

बीडच्या माजलगाव तालुक्यातील, किट्टी आडगाव, एकदरा, देवखेडा, टाकरवण, तालखेडसह राजेवाडी या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून या गावांमध्ये जिलजीवनचे काम अर्धवट असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

Jalgaon Live: जळगावातील कृषी विभागातील स्लॅबचा भाग कोसळला

जळगावच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील तांत्रिक कक्ष कार्यालयात स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान यावेळी कार्यालयात कोणीही कर्मचारी अधिकारी नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेजारील सर्व शिक्षा अभियान कार्यालय जीवितहानीच्या भीतीने शिक्षण विभागात स्थलांतरित झालेले आहे.

Pune Live : पुण्याच्या भोर तालुक्यातील रोहिडा किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक दर्जा

भोरमधील बाजारवाडी येथील ऐतिहासिक रोहिडा म्हणजेच विचित्रगडाला,राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने संरक्षित दर्जा घोषित केला असून, 25 तारखेला याबाबतचे परिपत्रक जारी केलयं..

त्यामुळे गडासह वनविभागाच्या हद्दीत विकासकामे होणार असल्यामुळे, पर्यटकांची संख्या वाढून गावात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार

Mumbai Live : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा

10 मिनिटांच्या प्रवासाला लागतो आहे दीड तास

शाळांना सुटी लागल्याने चाकरमानी निघाले गावाला

महाराष्ट्र दिनानिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात निघाले

वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहनांची कोंडी

इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहतूक संथ गतीने

वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक .....

माणगाव आणि इंदापूर या दोन्ही बाजार पेठांमध्ये अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा

Live : केंद्र सरकारच्या जातीयनिहाय जनगणनेची घोषणा, काँग्रेसकडून निर्णयाचं स्वागत

पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जातीयनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर जल्लोष

पुण्यातील फुले वाड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष

"सामाजिक न्यायाच्या क्रांतीचे नवीन नायक राहुल गांधी" असे हातात बोर्ड घेऊन कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

फुले वाड्यात एकमेकांना पेढे भरवून आणि ढोल ताशा वाजवत आनंदोत्सव

जातीनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मागणीचा विजय असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया

Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वेव्हज परिषदेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज वेव्हज परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं आहे.

Live Update: भारत-इजिप्त दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची चौथी बैठक पार पडली

भारत-इजिप्त दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची चौथी बैठक कैरो येथे संपन्न

सदानंद दाते NIS टिमसह पहलगाममध्ये दाखल

सदानंद दाते पहलगाममध्ये घटनास्थळाची पाहणी करणार आहे.

Sanjay Raut Live: देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत का?, राऊतांचा चिमटा

देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना? का त्यांनी राजकारण सोडले आहे? त्यांचं काही आकलन वाचन चिंतन सुरुय का? असा चिमटा काढत संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं. जातीय जनगणनेवर बोलताना राऊत म्हणाले, मागील दहा वर्षांपासून राहुल गांधी सातत्याने जातीय गणना करण्याची मागणी करत आहेत. त्यांचं पार्लमेंटमधील आणि जाहीर सभांमधील भाषणे बघा, असा सल्ला राऊतांनी दिला.

Mumbai Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.

Mumbai Live : फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर

फडणवीस सरकारच्या 100 दिवसांचा रिझल्ट समोर आला असून यात महिला व बालकल्याण विभाग अव्वल असून विभागाला 100 पैकी 80 मार्क्स मिळाले आहेत.

Mumbai Live : राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा जाहीरपणे सत्कार करावा- चंद्रशेखर बावनकुळे

जातीय जनगणनेसाठी वेळ निश्चित करण्याच्या राहुल गांधींच्या मागणीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा जाहीरपणे सत्कार करावा. आम्हाला अपेक्षा आहे की ते आणि शरद पवार आपापल्या पक्षांमध्ये या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणारे ठराव मंजूर करतील. महाराष्ट्र भाजप १ लाखाहून अधिक पक्षाच्या बूथ युनिट्समध्ये पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करेल." असेही बावनकुळे म्हणाले.

Parali Live : धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी तहसील कार्यालयात ध्वजारोहण

आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी ध्वजारोहन करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

Mumbai Live : महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी हुतात्म्यांना केले अभिवादन

मुंबई महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी हुत्मात्यांना आणि महापुरुषांना अभिवादन केले ते म्हणाले की, "मी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील इतर महान समाजसुधारकांना अभिवादन करतो जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो. महाराष्ट्र सरकारने तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी योग्य ती कारवाई केली असंही ते म्हणाले.

Pakistani Army : पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा केला गोळीबार, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ३० एप्रिलच्या रात्री आणि १ मे'च्या पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने पुन्हा गोळीबार सुरू केला. हा गोळीबार कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये झाला, जे अनेकदा तणावाचे केंद्र बनले आहे. या कारवाईला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

LPG Price 1 May 2025 : एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; इंडियन ऑइलने गॅसचे जारी केले नवे दर

इंडियन ऑइलने एलपीजी गॅसचे नवे दर जारी केले आहेत. आज १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहे. व्यावसायिक सिलिंडरचा दर १७ रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर आता १८६८.५० रुपयांऐवजी १८५१.५० रुपये झाला आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत आता १७१३.५० रुपयांऐवजी १६९९ रुपये आहे आणि चेन्नईमध्ये १९२१.५० रुपयांऐवजी १९०६.५० रुपये आहे. तर, घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ८५३ रुपयांना, कोलकातामध्ये ८७९ रुपयांना, मुंबईत ८५२.५० रुपयांना आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर गुन्हा दाखल, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप

शिर्डी : प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांना बेसल डोसचे वाटप करण्याच्या नावाखाली बॅंकेतून ८ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज काढले. परंतु ही रक्कम सभासदांना न देता उलट कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ, साखर आयुक्त व सबंधित बॅंक अधिकारी अशा ५४ जणांविरुध्द सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बाळासाहेब केरूनाथ विखे (वय ६६) यांनी फिर्याद दिली आहे.

Amul Milk Price Hike : मदर डेअरीनंतर 'अमूल'नेही दुधाचे दर वाढवले; आजपासून दूध दोन रुपयांनी महागणार

नवी दिल्ली : 'अमूल'ने सामान्य माणसाला मोठा धक्का दिला आहे. आता दूध पिणे महाग होणार आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. कंपनीने किमतींमध्ये केलेला हा बदल आजपासून म्हणजेच १ मे पासून लागू होणार आहे. कंपनीने अर्धा किलो दुधाच्या म्हणजेच ५०० मिली दुधाच्या किमतीतही वाढ केली आहे. अमूलच्या लहान पॅकची म्हणजेच, अर्धा लिटर दुधाच्या पाऊचची किंमतही प्रति लिटर १ रुपयांनी वाढणार आहे.

MHT-CET Exam : सत्तावीस हजार विद्यार्थी पुन्हा सीईटी देणार; सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती

मुंबई : राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राज्यात २७ एप्रिल रोजी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यातील इंग्रजी भाषेतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील २१ प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय आढळल्याने सीईटी सेलने संबंधित विद्यार्थ्यांची पुढील आठवड्यात नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी मुंबईत दिली. यापरीक्षेला ३१ हजार २० विद्यार्थी बसले होते. त्यातील २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेत एकूण २१ प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय होते.

Union Cabinet : यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या 'एफआरपी'त प्रतिटन १५० रुपयांची वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

कोल्हापूर : यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन ३५५० रुपये दर मिळेल. गेल्या वर्षीच्या हंगामात हा दर ३४०० रुपये प्रतिटन होता.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जाणार नाहीत

मॉस्को : रशियामध्ये नऊ मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले. त्यांच्याऐवजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित राहू शकतात.

Maharashtra Day : राज्यात महाराष्ट्र दिन, तर संपूर्ण देशभरात साजरा होणार कामगार दिन

Latest Marathi Live Updates 1 May 2025 : आज राज्यात महाराष्ट्र दिन, तर संपूर्ण देशभरात कामगार दिन साजरा होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य कारवाईचे कयास लढविले जात असताना केंद्र सरकारने आज धक्क्कातंत्राचा अवलंब करताना जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. जातनिहाय जनगणनेच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे. तसेच यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रशियामध्ये नऊ मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.