कोलकता : मध्य कोलकतामधील बुराबाजार येथील मेचुआपट्टी भागात एका हॉटेलला मंगळवारी (ता.२९) रात्री भीषण आग लागली. यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १३ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.
बहुतांश जणांचा मृत्यू गुदमरल्यानेच झाल्याचे सांगण्यात आले. मृतांत एक महिला व दोन मुले यांचा समावेश आहे. हॉटेलला काल सायंकाळी साडेसातला आग लागल्याचे निदर्शनास आले. आतापर्यंत आठ मृतांची ओळख पटली आहे.
या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अग्निशमन दलाच्या दहा तासांच्या अथक प्रयत्नांनी आज पहाटे साडेतीन वाजता आग नियंत्रणात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मदतीची घोषणा ‘एक्स’च्या माध्यमातून केली आहे.