मराठमोळे अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्यांनी चित्रपट आणि नाटक अशी दोन्ही माध्यमं गाजवली. सध्या मराठी चित्रपटांची अवस्था वाईट आहे. अनेक तळागाळातले निर्माते आणि दिग्दर्शक उत्तम चित्रपट बनवतात. मात्र प्रेक्षक या चित्रपटांना फारशी दाद देत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांना त्याचा फटका बसतो. अशाच एका निर्मात्याला भरत जाधव यांनी मदत केली होती. मात्र ही मदत कुणालाही सांगायची नाही असं त्यांनी सांगितलं. लोकप्रिय अभिनेत्याने याबद्दल एका पोस्टमधून सांगितलं आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील चारुहास म्हणजेच अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी भरत यांचा हा किस्सा सांगितला आहे. स्वप्नील यांनी पोस्ट करत लिहिलं, 'मुद्दा असतो एका सकारात्मक कृतीचा. ती महत्वाची असते. आणि निरपेक्ष भावनेतून केलेली कृती तर अनन्यसाधारण मोठी ठरते आजच्या जगात. ‘तेंडल्या’ नावाचा भन्नाट सिनेमा सचिन जाधव आणि चमुने अत्यंत अनेक वर्षांच्या कष्टाने बनवला.. शेत गहाण ठेवुन, गहाणवट शेतीत राबुन, त्यातला पैसा सिनेमात लावुन. सिनेमा गेल्या १० वर्षात मराठी मधे बनलेल्या सर्वोत्तम पाचात येईल ईतका भारी झाला… पण थिएटरमध्ये त्याचं काही घडलं नाही. नेहमीची सगळी कारणं, वितरण न होणे, थिएटर्स न मिळणे, प्रेक्षकांची अनास्था ई.'
त्यांनी पुढे लिहिलं, 'खचुन न जाता तेंडल्याच्या मेकर्सनी “तेंडल्या तुमच्या दारी” चळवळ सुरु केली.. गावोगावी शाळा कॉलेजं सोसायटी ई. मधे जाऊन सिनेमा दाखवायचा. या उपक्रमाची सुरुवात करताना जो प्रदर्शन कार्यक्रम झाला त्यासाठी आपला सुपरस्टार भरत जाधव आणि मी गेलो. चांगल्या सिनेमाला एक पाठींबा म्हणुन. भरतला सिनेमा अत्यंत आवडला. मेकर्सची जिद्द भावली.. स्वयंप्रेरणेनं त्यानं या उपक्रमाला एक रक्कम प्रदान केली. त्याची वाच्यता कुठेही न करण्याचा अटीवर… रक्कम त्या मेकर्सना आधार देणारी.. त्यापेक्षा भरत जाधव सारखा अभिनेता आपल्या पाठीशी उभा रहातोय ही भावना प्रचंड बळ देणारी.. त्याच्या या gesture ने सगळेच भारावले… मला व्यक्तिशः वाटलं की ही गोष्ट अनेकांना प्रेरक ठरेल…'
'सध्याच्या नकारात्मक वातावरणामधे अशा सकारात्मक गोष्टींचा दिलासा मिळतो…कुणीतरी अत्यंत निरपेक्ष भावनेने कुणासाठी, विशेषतः नव्या कलावंतासाठी काही करु पहातंय हे किती आनंददायी आहे… भरतला वारंवार विनंती करुनही तो याची जाहिर वाच्यता न करण्याच्या अटीवर ठाम होता…शेवटी मी हट्टाने त्याच्याकडुन परवानगी न घेता ही गोष्ट लिहीतोय.. ती सांगणं महत्वाचं आहे म्हणुन…भरत सारखे अनेक मराठी कलावंत ढिंढोरा न पिटता सर्वतोपरी समाजकार्यासाठी हातभार लावत असतात, हे मी जवळून पाहिलंय… आपली ही बाजू कळु देण्याची त्यांची वृत्ती नसते. पण हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं…गरजेचं आहे…मराठी कलांवत पैशाने असतील, त्याहुन मनाने श्रीमंत आहेत हे समजायला हवं आपल्याच मायबाप प्रेक्षकाना.'