सोलापूर : गाडी चालविताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या नऊ ते दहा हजार वाहनचालकांना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी समन्स बजावले आहे. तर समन्स बजावून देखील राष्ट्रीय लोकअदालीवेळी गैरहजर राहिलेल्या १३०० चालकांना वॉरंट काढण्यात आले आहे. वाहनांवरील दंड न भरल्याने पोलिसांनी ही ॲक्शन घेतली आहे.
सोलापूर शहरात स्मार्ट सिटीतून विविध रस्त्यांवर सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यातून बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाते. दुसरीकडे वाहतूक पोलिस देखील चौकाचौकात कारवाई करतात. अनेकजण दुचाकीवरून ट्रीपल सीट जातात, काहीजण रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. काहींचा वेग अमर्याद असतो तर अनेकजण वाहन चालविताना मोबाईलवर बोलतात. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात.
तो दंड ९० दिवसांत भरावा लागतो, अन्यथा त्यांना राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने तो भरावा लागतो. दंड न भरल्यास पोलिसांकडून संबंधित बेशिस्त वाहनचालकांना समन्स बजावले जाते. तरीदेखील दंड न भरता लोकअदालतीला गैरहजर राहिल्यास त्यांना न्यायालयाच्या आदेशाने वॉरंट बजावले जाते. त्यानुसार आता १० मे रोजी होणाऱ्या लोकअदालतीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना समन्स व वॉरंट बजावले आहे.
वाहनचालकांना ‘येथे’ भरता येईल दंडज्या वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड झाला आहे, त्यांनी वेळेत दंड भरणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे वाहन जप्त देखील होऊ शकते. समन्स बजावूनही दंड न भरणाऱ्यांना वॉरंट काढले जाते. तरीदेखील दंड न भरल्यास त्या वाहनचालकास अटक होऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी त्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात किंवा दंडाच्या मेसेजमधील लिंकद्वारे देखील दंड भरता येतो. याशिवाय वाहतूक पोलिसांकडे जाऊन देखील ते दंड भरू शकतात.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांना समन्स व वॉरंट बजावले असून त्यांनी १० मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत उपस्थित राहून दंड भरणे क्रमप्राप्त आहे. वॉरंट बजावूनही गैरहजर राहणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना न्यायालयाच्या आदेशाने अटक देखील होऊ शकते.
- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर